पुणे – गरीब आणि गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचे धान्य रेशनवर मिळावे, त्यांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, असे आवाहन आमदार शिरोळे यांनी रेशनिंग ऑफिसर, रेशन दुकानदार आणि दक्षता समिती सदस्य यांच्या एकत्रित बैठकीत बोलताना केले.
शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक अन्नधान्य वितरण व्यवस्था परिमंडळ कार्यालय क विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि दुकानदार यांची एकत्रित बैठक आमदार शिरोळे यांनी घेतली. या बैठकीत नवनियुक्त दक्षता समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. रेशनिंग व्यवस्था ही गरीब माणसासाठी अत्यावश्यक सेवा आहे. गरीब वर्गाला रेशनिंगद्वारे माफक किमतीत अन्नधान्य मिळते. कोरोना साथीतील ओढग्रस्तता लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य व्यवस्था उभी केली. त्याचे वितरणही रेशन दुकानांमार्फत होते. रेशनव्यवस्था ही गरीबांसाठीची सेवा आहे. ती प्रामाणिकपणे करावी, असे आवाहन आमदार शिरोळे यांनी केले.
या बैठकीला सार्वजनिक अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकारी एस.एस.खोमणे तसेच गणेश बगाडे, महेंद्र उर्फ बंडू कदम आदी उपस्थित होते.