पुणे महानगर पालिकेच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी मंजुश्री संदीप खर्डेकर तर उपाध्यक्षपदी कालिंदा मुरलीधर पुंडे यांची निवड झाली.
महापालिकेच्या नवीन इमारतीमधील स्थायी समितीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया शुक्रवारी पार पडली. महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. शिक्षण समितीमध्ये १३ पैकी आठ सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. भाजपकडून अध्यक्षपदासाठी सौ .मंजुश्री खर्डेकर यांना तर उपाध्यक्ष पदासाठी कालिंदा पुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. महाआघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुमन पठारे यांना तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांना संधी देण्यात आली होती. समितीत भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.
खर्डेकर आणि पुंडे यांना अनुक्रमे आठ तर पठारे आणि आल्हाट यांना चार मते मिळाली. पीठासीन अधिकारी म्हणून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आयुष प्रसाद यांनी काम पाहिले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेता गणेश बिडकर, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ आदी उपस्थित होते.
सौ.मंजुश्री खर्डेकर यांना २०१२ ते २०१७ शिक्षण मंडळ सदस्य म्हणून केलेल्या कामाचा अनुभव आहे.२०१७ च्या सार्वत्रिक निवडणूकीत प्रभाग १३ एरंडवणा हॅपी कॉलनी प्रभागातून १८००० च्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडे आपण लक्ष केंद्रित करणार असून शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शालेय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सौ.मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.