पुणे-‘कामाचे नियोजन करा आणि नियोजनाप्रमाणे काम’ हा कानमंत्र देत स्वर्गीय गिरीश बापट यांनी ज्या कार्यालयातून देऊन माझ्या सारख्या असंख्य भाजप कार्यकर्त्यांना घडविले, त्याच कार्यालयातून मुख्य निवडणुक कचेरी सुरू करताना विशेष आनंद होतो, अशा भावना भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केल्या.
रासने यांच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन 95 वर्षांच्या माजी नगरसेविका मीराताई पावगी यांच्या हस्ते आणि महायुतीच्या महिला लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत करताना रासने बोलत होते. शहराध्यक्ष धीरज घाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
रासने म्हणाले, “महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांना सन्मान दिला. तोच संदेश आम्हाला कसब्यातील मतदारांना द्यायचा आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ सारखी योजना आणून राज्यात कौटुंबिक जिव्हाळ्याचे वातावरण निर्माण केले. असेच वातावरण कसब्यात निर्माण व्हावे म्हणून आम्ही माता-भगिनींच्या हस्ते कचेरीचे उद्घाटन केले.”
रासने पुढे म्हणाले, “सरकारी दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या रकान्यात न करता उमेदवाराचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरूपात नोंदवणे बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला. यावरून महायुती शासन महिलांचा सन्मान करते ही बाब अधोरेखित होते.”
रासने यांच्या प्रचारार्थ कसबा गणपतीपासून महिलांची पदयात्रा आयोजित केली होती. साततोटी चौक, कस्तुरी चौक, घोरपडे पेठमार्गे समता भूमी येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाला अभिवादन करून पदयात्रेचा समारोप झाला. स्वरदा बापट, रुपाली ठोंबरे, अश्विनी पवार, वैशाली नाईक, सुरेखा पाषाणकर, कल्पना जाधव, आरती कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर, सुप्रिया कांबळे, सुरेखा कदम-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.