पुणे -पानशेत पूरग्रस्त सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना 99 वर्षांचा भाडेतत्त्वावर दिलेल्या जागा पूरग्रस्तांना मालकी हक्काने देण्याचा दुरुस्तीचा अध्यादेश सरकारने काढला होता. या सोसायट्यांशी संबंधित विविध बाबींविषयी पुरेशी स्पष्टता नव्हती. त्यामुळे सुधारित अध्यादेश काढावा यासाठी पाठपुरावा केला. नवीन अध्यादेशामळे सोसायट्यांसाठी नियमावली, दंड आणि अन्य कायदेशीर बाबींबाबत पुरेशी स्पष्टता आहे. या निर्णयाचा शहरातील 103 सोसायट्या, चार हजार कुटुंब आणि 80 हजार पुणेकरांना लाभ होणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.
मिसाळ यांच्या प्रचारार्थ सहकार नगर परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. गजानन महाराज चौकातून प्रचारफेरीला प्रारंभ झाला. सहकारनगर नंबर 2, ढुमे हॉल चौक, सारंग पोलीस चौकी, गंगातीर्थ रोड, अरण्येश्वर मंदिर, शिवदर्शन, सत्यवीर मित्र मंडळमार्गे राजीव गांधी ई लर्निंग स्कूल येथे पदयात्रेचा समारोप झाला. महेश वाबळे, गणेश घोष, अनिल जाधव, प्रशांत थोपटे, श्रृती नाझीरकर, सुधीर कुरुमकर, हरीष परदेशी, बिपीन पोतनीस, रामदास गाडे, औदुंबर कांबळे, आर्पपा कोरपे, दत्ता टिकेकर, रफीक शेख, रवींद्र चव्हाण, अमोल खंडाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, “बिबवेवाडीतील हिल टॉप हिल स्लोप आरक्षणातील काही ठरावीक जमीन वगळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सुमारे सात एकरचे तीन भूखंड वगळण्याची अधिसूचना नगर विकास विभागाने काढली होती. या ठिकाणच्या सर्व भूखंडधारकांसाठी एकच निर्णय घ्यावा आणि सर्वांना न्याय द्यावा अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत घेऊन या निर्णयाला स्थगिती दिली.”