धुळे- काँग्रेसचा जाती-जातीमध्ये भांडणे लावण्याचा डाव आहे. माजी पंतप्रधान पंडित नेहरूंपासून ते त्याच परिवारातील युवराज (राहुल गांधी) पर्यंत नेहरू-गांधी परिवार आरक्षण विरोधी आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. ते धुळ्यामध्ये आयोजित प्रचारसभेत बोलत होते.मोदी म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासाठी मोठी लढाई लढली. दलित, मागासवर्गीयांना आरक्षण मिळू नये म्हणून माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी प्रयत्न केले. एससी, एसटींना आरक्षण मिळू नये यासाठी इंदिरा गांधींनी प्रयत्न केले. राजीव गांधी ओबीसी आरक्षणविरोधी होते. आता त्याच परिवारारातले युवराज आरक्षण विरोधी आहेत. त्यांच्याकडून देशातील ओबीसींना छोट्या-छोट्या जातीमध्ये वाटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.
काँग्रेसने पूर्वी धर्माच्या नावावर कट रचला. आता जाती-जातीमध्ये फूट पाडणे सुरू आहे.आदिवासी, ओबीसींच्या लहान-लहान जातींमध्ये भांडणे लावण्यात येत आहेत. या जाती एक राहिल्या तर त्यांची ताकद वाढेल. आम्ही एकत्र राहिलो, तरच सुरक्षित असू, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी धुळ्यातील आपल्या पहिल्या प्रचारसभेत विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवत राज्यातील जनतेला महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक आहे. त्यातच त्यांच्यात ड्रायव्हरच्या सिटवर बसण्यासाठीही वाद सुरू आहे. त्यांच्यात चारही बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न ऐकू येत आहेत, याऊलट महायुती सरकारच्या अडीच वर्षांत महाराष्ट्र विकासाच्या एका नव्या उंचीवर पोहोचला आहे, असे ते म्हणालेत. आचारसंहिता संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मागील अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासाला जी गती मिळाली आहे ती थांबू देणार नाही. पुढील 5 वर्षांत महाराष्ट्राच्या प्रगतीला एका नव्या उंचीवर घेऊन जाणार. महाराष्ट्राला हवे असणारे सुशासन केवळ महायुतीचेच सरकार देऊ शकते. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाके आहेत, ना ब्रेक आहे आणि ड्रायव्हरच्या सिटवर बसण्यासाठीही त्यांच्यात वाद सुरू आहे. त्यातच चारही बाजूंनी वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्न ऐकू येत आहेत.राजकारणात आल्यानंतर प्रत्येकाचे एक लक्ष्य असते. आमच्यासारखे लोक जनतेला ईश्वराचे रूप मानतात. आम्ही जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलोत. याऊलट काही लोकांच्या राजकारणाचा आधार हा लोकांना लुटण्याचा आहे. हे लोक सरकारमध्ये आले की, ते विकास ठप्प करतात. ते प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. तुम्ही महाविकास आघाडीचे धोक्यातून बनलेल्या सरकारचे अडीच वर्षे पाहिले. या लोकांनी प्रथम सरकारची लुट केली. त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लूट केली. त्यांनी मेट्रो प्रकल्प ठप्प केले. वाढवण बंदरांच्या कामात अडथळे निर्माण केली. समृद्धी महामार्गाच्या कामात अडथळे निर्माण केले.महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रत्येक प्रकल्प ठप्प केला. या प्रकल्पांमुळे येथील जनतेचे भविष्य उज्ज्वल होणार होते. ही स्थिती तेव्हा बदलली, जेव्हा तुमच्या आशीर्वादाने येथे महायुतीचे सरकार आले. महायुतीच्या अडीच वर्षांत महाराष्ट्राने विकासाचे नवे विक्रम रचले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात अडीच वर्षांत महाराष्ट्राला त्याचा गौरव परत मिळाला आहे. विकासाचा भरवसा परत मिळाला आहे. त्यामुळे येथील मतदारांनी भाजप महायुती आहे, तरच गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे हे लक्षात घ्यावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.मोदी म्हणाले, मी आज महायुतीला खूप खूप शुभेच्छा देतो. या सरकारने महाराष्ट्राला नवी समृद्धी देणारा वचननामा जाहीर केला आहे. महायुतीच्या 10 संकल्पांची खूप चर्चा होत आहे. शिंदे, माझे मित्र देवेंद्र फडणीस व अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या सूचनांचा हा शानदार वचननामा तयार केला आहे. महायुतीचा वचननाम्यामुळे विकासाची वाढेल गती, महाराष्ट्राची होणार हमखास प्रगती.महायुतीच्या या वचननाम्यात प्रत्येक वर्गाच्या आर्थिक प्रगतीची योजना आहे. समानतेचा भाव आहे. सुरक्षेची हमी आहे. तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा विश्वास आहे. यात महाराष्ट्राच्या भविष्याचा रोडमॅप आहे. मी अशा जनकल्याणाच्या जाहिरनाम्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचेही कौतुक करतो. हा वचननामा विकसित महाराष्ट्राचा आधार बनेल, विकसित भारताचा आधार बनले, असे ते म्हणाले.
या सभेला आमच्या भगिनी दूरवरून आल्यात. विकसित महाराष्ट्र व विकसित भारतासाठी आमच्या भगिनींचे जीवन सहज सुलभ बनवणे फार महत्त्वाचे आहे. कारण, जेव्हा महिला पुढे जातात, तेव्हा संपूर्ण समाज वेगाने प्रगती करतो. त्यामुळे मागील 10 वर्षांत केंद्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून अनेक मोठे निर्णय घेतले. मागील सरकारने सैनिकी शाळांपासून कामाच्या विविध क्षेत्रांत महिलांचे मार्ग रोखला होता. पण हा मोदी आहे. त्याने हे सर्व बंधन काढले. महिलांना अधिकाधिक क्षेत्रांत कामाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांनी सर्व दरवाजे उघडले. आम्ही नारीशक्ती वंदन कायद्याद्वारे विधानसभा व संसदेत महिलांना आरक्षणाचा अधिकार दिला. शौचालयांपासून गॅस सिलिंडरपर्यंत सर्वच योजनांच्या केंद्रस्थानी महिलाच आहेत. आम्ही या योजना सुरू केल्या तेव्हा काँग्रेसने आमची खिल्ली उडवली. पण आज याच योजना महिला सक्षमीकरणाच्या पर्याय बनल्या आहेत, असे मोदी म्हणाले.पीएम मोदी पुढे म्हणाले, राज्यातील महायुती सरकारही आमचा दृष्टिकोन पुढे नेण्याचे काम करत आहे. येथील माता-भगिनींसाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या. आज महाराष्ट्रातील प्रत्येक दस्तावेजांवर आईचे नाव अनिवार्य करण्यात आले आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाचे प्रत्येकाने मोकळ्या अंतकरणाने स्वागत केले. महाराष्ट्र पोलिसांतही 25 हजार मुलींच्या भरतीतून एक नवा विश्वास तयार होईल असा मला विश्वास आहे. यामुळे महिलांचे सामर्थ्य वाढेल, एक नवा विश्वास तयार होईल, महिला सुरक्षेतही वाढ होईल, तसेच मुलींना रोजगारही मिळेल.आमच्या सरकार महिला सक्षमीकरणासाठी अनेक पाऊले उचलत आहे. हे काँग्रेस व महाविकास आघाडीला सहन होत नाही. यामुळेच ते माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करत आहेत. या योजनेची देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा सुरू आहे. पण काँग्रेस ही योजना बंद करण्यासाठी विविध कटकारस्थान रचत आहे. काँग्रेसच्या इको सिस्टिमवाले लोक या योजनेविरोधात कोर्टात गेले आहेत. काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षांना ही सत्ता मिळाली तर सर्वप्रथम ते ही योजना बंद करतील. त्यामुळे जनतेने त्यांच्यापासून सावध रहावे. कारण हे लोक कधीही नारीशक्तीला सशक्त होताना पाहू शकत नाहीत, असे ते म्हणाले.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ही अनेक वर्षांची मागणी होती. काँग्रेसने महाराष्ट्र व केंद्रात सरकार चालवले, पण त्यांनी हा दर्जा दिला नाही. पण आमच्या सरकारने हा दर्जा देऊन दाखवला, असे म्हणाले.महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारने केलेले काम सर्व जग पाहत आहेत. आज परदेशी गुंतवणुकीत, नव्या संधीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र सलग 2 वर्षे परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर राहिले आहे. या वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यांत 50 टक्क्यांहून जास्त परदेशी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आला. महाराष्ट्राला सर्वच गुंतवणूक योजनांत प्राधान्य दिले जात आहे, असे मोदी म्हणाले.मी वाढवण बंदराच्या पायाभरणीला आलो होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एक इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, देशाचे सर्वात मोठे बंदर तयार होत आहे, मोदीजी एवढे सारे करत आहात, हजारो कोटी लावत आहात, तर तिथे एक विमानतळही तयार करा. मी तेव्हा गप्प राहिलो. पण आचारसंहिता संपून राज्यात महायुतीच्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर मी महाराष्ट्र सरकारसोबत बसून फडणवीस यांची इच्छा पूर्ण करण्याचे काम करेन, असे मोदी म्हणाले.काँग्रेस आघाडी एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये दलितांना मिळालेला अधिकार प्रस्ताव हिसकावून घेण्याचा प्रस्ताव पारित करते. तर दुसरीकडे, महाराष्ट्रात दलित व आदिवासींच्या अधिकाऱ्यांचे नावाने खोटे पसरवणे, दिशाभूल करणे, त्यांना भडकावण्याचे काम करत आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर जम्मू काश्मीरमध्ये बाबासाहेबांचे संविधान लागू झाले आहे. पण काँग्रेस व त्यांच्या मित्रांना हे सहन होत नाही. त्यांनी पाकिस्तानचा अजेंडा देशात राबवण्याचा प्रयत्न करू नये. काश्मीरसंबंधी फुटिरतावाद्यांची भाषा बोलू नका. तुमचे हे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. मोदींवर जनतेचा आशीर्वाद असेपर्यंत तुम्हाला काश्मीरमध्ये काहीही करता येत नाही. काश्मीरमध्ये आता केवळ बाबासाहेबांचेच संविधान चालेल. हा मोदींचा निर्णय आहे. जगातील कोणतीही ताकद आता काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू शकत नाही. महाराष्ट्र आर्थिक प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे, असेही मोदी यावेळी काँग्रेसवर हल्लाबोल करताना म्हणाले.