माजी खासदार प्रदीप रावत यांचे आवाहन; शिवाजीनगर मतदारसंघात भाजपचा मेळावा
पुणे, दि. ८ नोव्हेंबर, २०२४ : घराघरापर्यंत असलेला संपर्क ही भाजपची खरी ताकद आहे. समर्पित कार्यकर्ता ही पक्षाची ओळख आहे. म्हणूनच प्रत्येक कार्यकर्त्याने मतदानाच्या दिवसापर्यंत झोकून देत काम करावे , असे आवाहन माजी खासदार प्रदीप रावत यांनी केले.
शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपचे आजी-माजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सहकुटुंब मेळावा हॉटेल सेंट्रेल पार्क येथे आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुजाता सिद्धार्थ शिरोळे, प्रचारप्रमुख दत्ता खाडे, अपर्णा कुऱ्हाडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावत म्हणाले, “महायुती सरकारने जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले व्हिजन लोकांपर्यंत पोचवण्याचे काम सिद्धार्थ शिरोळे करत आहेत. महिला, युवक, ज्येष्ठ नागरीक या सगळ्यांसाठी उपयुक्त अशा या योजनांमुळे सामान्यांचे जगणे सुखकर बनले आहे. परंतु विरोधी पक्ष दिशाभूल करण्याचे काम करत आहे, त्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे.”
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धासाठी तलवारीसारखी शस्त्रे होती. परंतु या राजकीय युद्धात विचार हेच शस्त्र आहे. भाजपचा विचार घराघरात पोचवणे हे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकही मिनिट वाया न घालवता यासाठी झोकून दिले पाहिजे, असेही रावत यांनी सांगितले.
राज्यात महाआघाडीने जातीजातीत भांडणे लावण्याचे काम सुरू केले आहे. महायुतीने राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि विकासकामांकडे नागरीकांचे दुर्लक्ष व्हावे यासाठीचा हा डाव आहे. परंतु त्याला बळी न पडता आपण विकासकामे लोकांपर्यंत पोचवून भाजपला निवडून आणण्यासाठी कंबर कसली पाहिजे, असेही रावत यांनी नमूद केले. या मेळाव्याला पक्षाच्या सर्व सेलचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आणि युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.