पुणे : आडकर फौंडेशन पुरस्कृत कोमल पवार स्मृती पुरस्कार वितरण समारंभ आणि ‘पुनर्जन्म’ या विषयावर कविसंमेलनाचे बुधवारी (दि. 6) आयोजन करण्यात आले आहे.
मरणोत्तर अवयवदान संकल्पनेच्या प्रचाराचे गेली 24 वर्षे काम करणाऱ्या आरती देवगावकर यांचा कोमल पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असून पुरस्काराचे वितरण इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कार्यक्रम बुधवार, दि. 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पुनर्जन्म’ या विषयावर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात जयंत भिडे, मीरा शिंदे, विजय सातपुते, स्वप्नील पोरे, राजश्री सोले, साधना शेळके, विद्या सराफ, कांचन पडळकर, ऋचा कर्वे, प्रतिभा पवार, मिनाक्षी नवले, स्वाती सामक, प्रभा सोनवणे यांचा समावेश आहे, असे आडकर फौंडेशनच्या विश्वस्त मैथिली आडकर यांनी सांगितले. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.