हॅपी कॉलनी फेडरेशनच्या वतीने आयोजित आणि देवगांवकर फाउंडेशन प्रस्तुत ‘दीप संध्या’ संगीत मैफल
पुणे : ‘चदरिया झीनी रे झीनी’ या भक्तीगीतासह ‘लागी कलेजवा कटार’ हे नाट्यगीत असे शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचे गोडवे गाणारी भक्तीगीते व अभंग यांच्या एकत्रित सादरीकरणातून शास्त्रीय – उपशास्त्रीय संगीताची सुरेल मैफल ‘दीप संध्ये’तून रसिकांनी अनुभवली.
हॅपी कॉलनी फेडरेशनच्या वतीने आयोजित आणि देवगांवकर फाउंडेशन प्रस्तुत ‘दीप संध्या’ संगीत मैफलीचे आयोजन कोथरूड मधील हॅपी कॉलनी सभागृहात करण्यात आले होते. यावेळी देवगांवकर फाउंडेशनचे मंदार देवगांवकर, अमृता देवगांवकर आदी उपस्थित होते.
करण देवगांवकर यांनी कार्यक्रमात गायन केले. त्यांना लीलाधर चक्रदेव (संवादिनी), कौशिक केळकर (तबला), आकाश तुपे (पखवाज), गंधार निसळ (टाळ) यांनी साथसंगत केली. वसुधा कुलकर्णी यांनी निवेदन केले.
‘महादेव महेश्वर’ या राग भूपाळी मधील बंदिशीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘लागी कलेजवा कटार’ या कट्यार काळजात घुसली चित्रपटातील गीताच्या सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कृष्णाअर्जुन युद्ध या नाटकातील पद ‘सुहास्य तुझे मनास मोही’ या गीताने शास्त्रीय गायकीचा आनंद रसिकांना दिला. अनुप जलोटा यांचे गाजलेले भक्ती गीत आणि संत कबीर यांनी आयुष्याला चादरीची उपमा देऊन रचलेले ‘चदरिया झीनी रे झीनी’ या गीताच्या सादरीकरणाने श्रोते भक्तीरसात न्हाऊन निघाले.
बा.भ.बोरकर यांनी रचलेले आणि जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले ‘नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी’ पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात गाजलेले ‘बाजे रे मुरलिया बाजे रे’ या गीतांचे सादरीकरण करून आपल्या गायकीने करण देवगांवकर यांनी रसिकांची मने जिंकली. विठू माऊलीचा गजर करीत ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ या भक्ती गीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाने वेगळी उंची गाठली.