मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्याने आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे यावेळी 6 मोठे पक्ष रिंगणात आहेत. त्यामुळेच बंडखोरांची संख्या अधिक आहे. राज्यात जवळपास सर्वच जागांवर बंडखोर उभे आहेत.आता सर्वांच्या नजरा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेकडे (४ नोव्हेंबर) लागल्या आहेत. त्यानंतर लढत कशी असेल ते स्पष्ट होईल. यंदाच्या निवडणुकीत 7 हजार 995 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. शेवटच्या दिवशी 4 हजार 996 जणांनी अर्ज भरले.
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरही महायुती आणि एमव्हीएने जागावाटपाचा फॉर्म्युला उघड केला नाही. उमेदवारांवर नजर टाकल्यास, महायुतीमध्ये 148 उमेदवारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे, तर MVA मध्ये 103 उमेदवारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे.दोन्ही पक्ष 2019 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा कमी जागांवर लढत आहेत. गेल्या वेळी भाजपने 164 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते तर काँग्रेसने 147 जागांवर आपले उमेदवार दिले होते.
याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने 80, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस 53, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 89, तर शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 87 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेना (संयुक्त) आणि राष्ट्रवादी (संयुक्त) प्रत्येकी 124 जागांवर लढले होते.महायुतीने यावेळी आपल्या मित्र पक्षांसाठी 5 जागा सोडल्या आहेत. दुसरीकडे, MVA चे छोटे मित्र 6 जागांवर निवडणूक लढवत आहेत. महायुतीच्या 2 आणि एमव्हीएच्या 3 जागांवर अजूनही परिस्थिती स्पष्ट झालेली नाही.