पत्रकार परिषदेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी
पिंपरी, पुणे (दि. २६ ऑक्टोंबर २०२४) या विधानसभा निवडणुकीत पिंपरी, चिंचवड, भोसरी यापैकी किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाला द्यावी, अन्यथा पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे माजी अध्यक्ष व प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य मनोज विष्णू कांबळे यांनी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
शनिवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस अध्यक्ष सायली नढे, पिंपरी चिंचवड शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले, सचिव संदीप शिंदे, स्वाती शिंदे, हरीश डोळस, संदेश नवले, सुरेश गायकवाड, युनूस बांगर, सुधाकर कुंभार, निखिल भोईर आदी उपस्थित होते.
यावेळी मनोज कांबळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाला मिळावी, यासाठी शहर काँग्रेसच्या वतीने वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. परंतु आज सकाळी माध्यमांमधून पिंपरी, चिंचवड, भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या एकाही इच्छुक उमेदवाराला संधी मिळाली नाही असे निदर्शनास येत आहे. यापूर्वी २००९ मध्ये चिंचवड विधानसभेतून भाऊसाहेब भोईर यांनी काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती. २०१४ मध्ये भोसरी विधानसभेतून हनुमंत भोसले, चिंचवड विधानसभेतून कैलास कदम तर पिंपरी राखीव विधानसभेतून मनोज कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मागील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला देखील उमेदवार मिळाला नाही, त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता. यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस पक्षाची हानी झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीने दिलेल्या उमेदवारांचा या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. हे पाहता पिंपरी चिंचवड शहरामध्ये या विधानसभा निवडणुकीत किमान एक तरी जागा काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मिळावी. अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली अन्यथा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही असा इशारा मनोज कांबळे यांनी दिला.
महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सायली नढे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शहरातून एकही नगरसेवक काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आला नाही, त्यामुळे महानगरपालिका सभागृहात काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. या परिस्थितीत बदल करायचा असेल तर या निवडणुकीत आणि पुढील काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चिन्ह घरोघरी पोहोचवणे आवश्यक आहे यासाठी ही मागणी करण्यात आली आहे. याचा काँग्रेसच्या वरिष्ठांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा असेही सायली नढे यांनी सांगितले.