वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शन; रविवारी शेवटचा दिवस
पुणे : वंचित विकास अभयाच्या वतीने ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ हे छोट्या व्यावसायिकांचे प्रदर्शन नवी पेठेतील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन येथे भरलेले आहे. शुक्रवारी (दि. २५) या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजिका अनघा चाफळकर यांच्या हस्ते झाले. प्रसंगी वंचित विकासच्या संचालिका सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले, मीनाक्षी नवले, चैत्राली वाघ, ‘निर्मळ रानवारा’च्या संपादक ज्योती जोशी, सल्लागार व पत्रकार श्रीराम ओक आदी उपस्थित होते. ‘निर्मळ रानवारा’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन यावेळी झाले.
गेल्या चाळीस वर्षांपासून वंचित विकास स्त्रिया आणि मुलांसाठी काम करत आहे. छोट्या व्यावसायिकांचे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यंदा प्रदर्शनात खास महिलांसाठी होम मिनिस्टर, मुलांसाठी गंमत जत्रा भरवण्यात आली. दिवाळीच्या वस्तू, फराळ, इमिटेशन ज्वेलरी, खाद्यपदार्थ, गिफ्ट आर्टिकल्स, कपडे, मुलांसाठी विज्ञान खेळणी, तसेच उत्तम प्रतीचा सुकामेवा निम्म्या किमतीत उपलब्ध असेल. उद्या रविवारी (दि. २७) सायंकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
अनघा चाफळकर म्हणाल्या, “प्रदर्शनात सहभागी महिलांनी स्वतःमधील क्षमता ओळखून एक पाऊल पुढे टाकले आहे. आपला स्वतःचा उद्योग सुरु करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे केलेले धाडस कौतुकास्पद आहे. जगताना, व्यवसाय वाढवताना येणाऱ्या समस्यांवर मात करत मागे न हटता सक्षम व्हावे. त्यातून तुम्हाला आत्मविश्वास मिळत जातो, जो भविष्यातील वाटचालीत उपयोगी पडतो.”
येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करावे, यासाठी जागृती अभियान करणारा स्टॉल प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचबरोबर एकल महिलांच्या सन्मानासाठी अभया संबोधावे, असा शासन आदेश येण्यासाठी सही अभियानही यावेळी राबवण्यात आले. जुने कपडे, वस्तू, ई-कचरा या प्रदर्शनात संकलित करण्यात येत आहे.