इंदापूर-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इंदापूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि कोणत्याही परिस्थितीत इंदापूरमध्ये तुतारीचाच विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या मतदारसंघात प्रवीण माने यांनी बंडखोरी करत काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदा इंदापुरात तिरंगी सामना होणार आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. तिसऱ्या आघाडीचे उमेदवार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. महत्त्वाचे म्हणजे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे उपस्थित नव्हते. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुसरीकडे मात्र आता तिरंगी लढत होणार असल्याने आजी-माजी आमदारांची धाकधूक वाढली आहे. इंदापूर विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत होणार, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. हर्षवर्धन पाटील यांनी हातात तुतारी घेतल्याने अस्तित्वात आलेल्या तिसऱ्या आघाडीतून प्रवीण माने की आप्पासाहेब जगदाळे हे उमेदवार असणार, असे निश्चित नव्हते. मात्र, बुधवारी सकाळी ‘माझे ग्रामदैवत बाबीरबुवाच्या चरणी नतमस्तक होऊन तेथील गुलाल पुडीत बांधून सभेला आलो आहे. त्या गुलालाची शपथ घेऊन सांगतो की, काहीही केले तरी मी उमेदवारी मागे घेणार नाही. हाताला फक्त कपाळाला गुलाल लावतो. तो उधळण्यावर फक्त तुमचा अधिकार आहे,’ अशा शब्दात आपला इरादा स्पष्ट करत माजी जिल्हा परिषद सदस्य, सोनाई उद्योग समुहाचे संचालक प्रवीण माने यांनी अपक्ष म्हणून इंदापूर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रवीण माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंदापूर शहरातून मोठी दुचाकी रॅली काढली. सर्व महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केले. दुसरीकडे माने यांची रॅली भरत शहा यांच्या दुकानासमोर आली. श्री नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टचे मुकुंद शहा, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच मुकुंद शहा यांचे वडील गोकुळदास शहा यांच्या प्रतिमेला माने यांनी अभिवादन केले. त्यावेळी शहा कुटुंबियांनी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरगच्च गर्दीत सभाही केली. यावेळी मात्र आप्पासाहेब जगदाळे अनुपस्थित होते.
आप्पासाहेब जगदाळेंची भूमिका निर्णायक
१९९५ मध्ये इंदापूर विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाल्यानंतर तत्कालीन अपक्ष उमेदवार निवडून आला होता. तिरंगी लढत झाली तर अपक्ष उमेदवार निवडून येतो हा इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे. मात्र, तिसऱ्या आघाडीतील महत्त्वाचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. जगदाळे यांचा आमदार दत्तात्रय भरणे यांच्याशी विशेष स्नेह आहे. हर्षवर्धन पाटील हे जरी मामा असले तरी त्यांच्याशी सख्ख नाही. काही दिवसांपासून प्रवीण माने किंवा अप्पासाहेब जगदाळे हे दोघेही तिघांच्या समन्वयातून उमदेवार निश्चित करण्यात येईल, असे सांगत होते. मात्र, प्रवीण माने यांनी उमदेवारी अर्ज दाखल केल्याने जगदाळे नाराज असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.