मुंबई-माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी पुण्यातून प्रवीण लोणकर याला ताब्यात घेतले आहे. लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात असलेल्या शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर असून त्याचादेखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे पोलिसांना चौकशीत आढळून आले आहे.
शुभम हा महाविद्यालयात असताना एनसीसी कॅडेट म्हणून देशसेवेचे धडे गिरवत असतानाच राजस्थानमध्ये भरती प्रक्रियेदरम्यान लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड झाला. शुभम याचे कुटुंबीय मूळचे अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी आहे. २०११ पासून शुभम हा पुण्यात राहण्यास आला होता, तर २०१९ मध्ये त्याचे कुटुंबीय कर्वेनगर परिसरात राहण्यास आलेले होते.
एनसीसीत असताना भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या विचारांपासून तो प्रेरित झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने भावासोबत भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. २०२२ मध्ये वारजे परिसरात ‘लोणकर डेअरी’ नावाने त्यांनी दुकान उघडले होते, असेही समोर आले आहे.
धर्मराज कश्यप, शिवकुमार करनैल गोळा करायचे भंगार-मुंबईमध्ये एप्रिल महिन्यात अभिनेता सलमानच्या घरावर जो गोळीबार झाला त्या गुन्ह्यात फरार आरोपी म्हणून त्याचेदेखील नाव दोषारोपपत्रात समोर आले होते. त्यामुळेच त्याने जुलै महिन्यात घरातून बाहेर पडताना कुटुंबीयांना मला शोधू नका तसेच माझ्यावर लक्ष देऊ नका, असे सांगितले होते. धर्मराज कश्यप, शिवकुमार गौतम आणि करनैल सिंह हेदेखील वारजे परिसरात राहत होते. हे तिघेही स्क्रॅप गोळा करण्याचे काम करत होते.
पुण्यातील आणखी काही जण लॉरेन्स टोळीच्या संपर्कात ?लॉरेन्स टोळीशी पुणे शहरातील आणखी तरुण संपर्कात आहे का ? याबाबत पुणे पोलिसांकडून सकल चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शुभम आणि त्याचा भाऊ यांचे काही काळ पुण्यात वास्तव्य होते. त्यामुळे आता पोलिस त्यांच्या संपर्कातील इतरांचाही शोध घेत असल्याचाही माहिती समोर आली आहे. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात-सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभम लोणकर हा लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात होता. प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांना आर्म्स ॲक्ट गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांच्या ताब्यातून दोन पिस्टल आणि काडतुसेदेखील जप्त केली होती. या गुन्ह्यात जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर प्रवीण हा डेअरीचे काम पाहत होता, तर शुभम हा जुलै महिन्यापासून पसार झाला. मे ते जूनदरम्यान तो पुण्यात वारजेनगर परिसरात राहत होता.
पुण्यातील वारजेत ‘लोणकर डेअरी’ नावाने उघडले होते दुकान-पुण्यामध्ये शुभम याने सुरुवातीला २०२२ मध्ये पुण्यात दूध डेअरची व्यवसाय सुरू केला होता. त्याच्या या व्यवसायाला चांगला प्रतिसादही मिळत होता. अनेक वेळा मुंबईला ये-जा करत असे. प्रवीण लोणकर यानेच हल्लेखोरांना राहण्यासाठी रूम भाड्याने दिली होती. तसेच लोणकर डेअरीशेजारी स्क्रॅप दुकानात काम करत होते.