मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कमाल फारुखींचाही काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई, दि. १४ ऑक्टोबर
काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दररोज वाढत असून आज टिळक भवनमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धृपदराव सावळे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार अविनाश घाटे, राज्य ग्राहक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे कमाल फारुखी, प्रवक्ते उमर फारुखी, अकोला जिल्ह्यातील वंचितचे डॉ. रहेमान खान, बाळापूरचे माजी नगराध्यक्ष जम्मूसेठ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
राज्यातील भाजपा शिंदे सरकारच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली असून शेतकरी, कामगार यांचे प्रचंड हाल होत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महागाईने जगणे कठीण झाले आहे परंतु राज्यातील युती सरकार जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाही. काँग्रेस पक्षाची विचारधाराच देशाला तारणारी असून राहुल गांधी यांची देश जोडणारी भूमिका सर्वात महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकी प्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यात काँग्रेस पक्षच सर्वात मोठा पक्ष म्हणून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करून काँग्रेसची विचारधारा तळागाळात पोहचवा असे आवाहन नाना पटोले यांनी यावेळी केली.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, मुझफ्फर हुसेन, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, राजीव गांधी पंचायत राज मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.