फाशीची शिक्षा होणारच होती , जी एन्काऊंटर पेक्षा भयानक होती,एन्काऊंटर ने त्वरित मुक्ती मिळाली ..पण कोर्टाने फाशी दिली असती तर फाशी होईपर्यंतचे जीवन हि मोठी शिक्षा असते आणि फाशीला कैदी सामोरे जातो तेव्हा अखेरची घटका जस जशी जवळ येते तसतसा तो तुटत जातो अखेरच्या वेळी तर फाशी गेट जवळ त्याला ओढत ओढत नेले जाते तेव्हाची अवस्था जेल मधील संबाधीतांनाच ठाऊक असते त्यामुळे एन्काऊंटर ने शिक्षा वाचली असा एक प्रवाह असताना याच पार्श्वभूमीवर साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलेली प्रतिक्रिया महत्वाची आहे .
सातारा -बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरवर साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रस्तुत प्रकरणातील गुन्हेगाराला फार सहज मरण दिले, त्याला तुडवून मारण्याची गरज होती, असे ते म्हणालेत. विरोधी पक्षांनी या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली.
बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेचे सोमवारी सायंकाळी एन्काऊंटर करण्यात आले. या प्रकरणी विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवत या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. शाळा प्रशासनाला पाठिशी घालण्यासाठी हे एन्काऊंटर करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले, मला सत्ताधारी किंवा विरोधक यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यांच्या कुटुंबासोबत हा प्रकार घडला असता तर त्यांनी काय केले असते? अत्याचार झालेल्या मुलीच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, त्या कुटुंबाच्या जागेवर मी स्वतःला ठेवून बोलत असतो. या घटनेतील आरोपीला गोळ्या घालून मारणे हे अतिशय सहज मरण झाले. अशा लोकांना जनतेत सोडले पाहिजे. त्यानंतर जनतेने त्यांना तुडवून मारले पाहिजे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जी न्यायव्यवस्था होती त्या प्रकारची न्यायव्यवस्था आज झाली पाहिजे. त्यासाठी सरकारने कायद्यात योग्य तो बदल करावा. बलात्कार केला की सरळ लोकांपुढे आरोपीला फाशी द्या.
दुसरीकडे, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास मंगळवारी सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. ठाणे क्राईम ब्रॅन्चच्या पोलिसांनी सोमवारी सायंकाळी आरोपी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर केले होते. पोलिस आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते. रस्त्यात त्याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून घेत गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या कारवाईत तो मारला गेला.
या घटनेनंतर अक्षय शिंदेच्या पालकांनी पोलिसांवर संशय व्यक्त केला आहे. अक्षयला पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी त्याचे एन्काऊंटर करण्यात आले. आम्हाला त्याचा मृतदेहही पाहू देण्यात आला नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, विरोधकांनीही अक्षयच्या हातात बेड्या होत्या, तर मग त्याने गोळीबार कसा केला? असा सवाल उपस्थित केला आहे.