पुणे:महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे ग्रंथालय आणि युवक क्रांती दलाच्या वतीने ‘किताबे कुछ कहती है ‘ हा चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . शनिवार,दि.२१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम गांधी भवन(कोथरूड) येथे झाला.या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.
‘ बोलना ही है’ ,’इष्क में शहर होना’ या रवीश कुमार यांच्या दोन पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली होती. पत्रकार,लेखिका हिना खान यांनी या दोन पुस्तकांचे रसग्रहण प्रस्तुत केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी ,या उपक्रमाच्या समन्वयक प्रा.डॉ.शशिकला राय, डॉ.ऊर्मिला सप्तर्षी ,विश्वस्त अन्वर राजन,अप्पा अनारसे,अॅड.स्वप्नील तोंडे,कैलास यादव , प्रमोद मुजुमदार,रजनी रणपिसे, अप्पा अनारसे उपस्थित होते. प्रारंभी स्वामिनी पारखे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. पोपट खोसे यानी हीना खान यांचा सत्कार केला एड. स्वप्नील तोंडे यांनी प्रास्ताविक केले. तेजस भालेराव यांनी आभार मानले
रविशकुमार यांच्या लिखाणाबद्दल बोलताना हीना खान म्हणाल्या,’ अल्पसंख्य समुदायाच्या हक्कांचा संकोच केला जात आहे.अल्पसंख्य समुदाय हा बहुसंख्य समुदायाच्यापेक्षा दुय्यम आहे,असे जाणवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.तशी सभोवताली परिस्थिती आहे.या पार्श्वभूमीवर रवीश कुमार यांच्या लिखाणाचे महत्व आहे.हा खेड्यातून शहरात आलेला पत्रकार आहे. अशावेळी शहरात वावरताना मनावर दडपण असते. पण संवेदनशीलता हे त्यांचे वैशिष्ट्य घेऊन ते पुढे जातात. बोलण्यासाठी कोणी तयार नाही, असे अनेक मुद्दे रवीश कुमार बोलत असतो. भय वाटू न देता तो बोलतो आणि तसेच लिहितो. त्यांची मांडणी मित्राने धीरगंभीरपणे बोलावे तशी आहे’.
‘आपल्यातील भीती संपली की सत्तास्थाने डळमळू लागतात. माणसाला माणसा विरुद्ध उभे केले जात आहे. पत्रकारिता खोटी होवू लागली आहे,हेच रवीश कुमार या पुस्तकातून मांडत राहतो. बोलणे, लिहिणे हेच पत्रकारांचे काम असून त्यावर बंधने आली आहेत. आवाज बंद करण्याच्या प्रवृत्तीचा निषेध होताना दिसत नाही. कळ लावून देणे ही पत्रकारिता वाहिनींच्या स्टुडिओ त वाढत आहे.टीकेच्या पातळीचा विचार केला जात नाही. सोशल मीडियावर आवेग दिसतो, मुद्दे कमी दिसत आहेत. अशावेळी रवीश कुमार यांची पुस्तकलेखनातील छोटी -छोटी वाक्ये प्रभावी ठरतात.’इश्क में शहर होना ‘मधून प्रेमळ आश्वासक व्यक्ती समोर येते. सर्व भिंती ओलांडून होणारे प्रेम सिनेमातून दिसत नाही. प्रेमासाठी शहरात जागा आहे का, असाही प्रश्न रवीश कुमार विचारतात. ‘प्रेम, सहवास यासाठी जागा नाही. मोकळीक नाही. माध्यमातून प्रेमाच्या गोष्टी पुढे न येता विखार येत आहे,असे रवीश कुमार मांडतात.ही दोन्ही पुस्तके वेगळी असली तरी लेखकाची ती अभिन्न अंग आहेत’,असेही हीना खान यांनी सांगितले.