वाढणारी थकबाकी हा कर्तव्यात कसूरच-महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे निर्देश
पुणे, दि. २० सप्टेंबर २०२४: पुणे परिमंडलामध्ये गेल्या एप्रिलपासून लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांच्या मासिक वीजबिलांच्या थकबाकीत सातत्याने वाढ होत आहे. वसूलीअभावी महावितरण सध्या आर्थिक प्रश्नांना सामोरे जात आहे. त्यामुळे वीजबिलांची सतत वाढणारी थकबाकी हा संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यातील कसूर आहे. थकबाकी वसूलीच्या उद्दिष्टासह मासिक वीजबिलांची १०० टक्के वसूली करणे क्रमप्राप्त आहे. त्यामध्ये हयगय चालणार नाही अशा सूचना महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी दिला.
गणेशखिंड येथील प्रादेशिक कार्यालयाच्या ‘प्रकाशभवन’ सभागृहात शुक्रवारी (दि. २०) पुणे परिमंडलातील वीजबिल वसूली व इतर कामांचा आढावा घेताना श्री. खंदारे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, प्रभारी महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत, अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, श्री. युवराज जरग, श्री. सिंहाजीराव गायकवाड, श्री. विजयानंद काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रादेशिक संचालक श्री. खंदारे म्हणाले की, पुणे परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ८ लाख ६१ हजार लघुदाब ग्राहकांकडे सध्या २६१ कोटी ३५ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर मासिक बिलांपोटी ९०५ कोटी रुपयांचा महसूल वसूल करायचा आहे. थकबाकीसह चालू मासिक वीजबिलांची १०० टक्के वसूली करण्यात कोणतीही कुचराई करू नये. तसेच महावितरणकडून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या जागांची तपासणी सुरु आहे. या विशेष मोहिमेत थकबाकी असलेल्या जागेवर विजेची चोरी आढळल्यास तात्काळ कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी असे निर्देश त्यांनी दिले.
महावितरण अभय योजनेतून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या जागेवरील थकबाकी शून्य करणे, मागणीनुसार नवीन वीजजोडणी देणे या कामांना आणखी वेग द्यावा. तसेच अतिप्रमाणात वीजगळती असलेल्या वीजवाहिन्यांचे पर्यवेक्षण करून वीजहानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरोधात आक्रमक कारवाई करण्याची सूचना प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केली. या बैठकीला पुणे परिमंडल अंतर्गत सर्व कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी आदींची उपस्थिती होती.