-माजी आमदार मोहन जोशी यांची पोलीसांत फिर्याद
पुणे – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन, त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्ये करणारे भाजपचे नेते तरविंदर सिंग मारवा, रेल्वे राज्यमंत्री रवनीत बिट्टू, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, उत्तर प्रदेशचे मंत्री रघुराज सिंग, भाजपचे खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हे दाखल करा, अशी फिर्याद माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी आज (शुक्रवारी) पोलीसात केली आहे.
पोलीस उपायुक्त आर.राजा यांना भेटून मोहन जोशी यांनी फिर्याद दाखल केली. यावेळी रमेश अय्यर, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, सुनील मलके, खंडू सतिश लोंढे, ॲड.निलेश गौड आणि सौ.पल्लवी सुरसे यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरूद्ध खोट्या बातम्या आणि प्रचार जाणीवपूर्वक करीत आहेत, असे मोहन जोशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. भाजपचे नेते तरविंदर सिंग मारवा यांनी दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसा व्हिडिओ त्यांनी एक्स या समाज माध्यमावर प्रसारित करून गंभीर गुन्हा केला आहे. बी एन एस कायदा कलम ३५१, ३५२, सह ६१ प्रमाणे गंभीर गुन्हा केला आहे. तसेच रेल्वे राज्यमंत्री रवनीत बिट्टू यांनी दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी मीडियासमोर मुलाखत देताना ‘राहुल गांधी टेररिस्ट है, देशका बडा दुष्मन है’, अशी विधाने करून अब्रुनुकसानीचा गुन्हा केला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी एका पब्लिक मिटिंगमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ कापून आणेल त्याला ११लाख रुपये बक्षीस देऊ, असे गुन्हेगारी वक्तव्य केले. महाराष्ट्रातील सार्वजनिक शांतता भंग करण्याचा गुन्हा केला आहे. तसेच बी एन एस कायदा कलम ४६, ५५, १९२, १९६ सह ६१ प्रमाणे गंभीर दखलपात्र गुन्हा केला आहे. उत्तर प्रदेशचे मंत्री रघुराज सिंग यांनी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ रोजी सार्वजनिकरित्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जात, धर्म, वंश, जन्मठिकाण याचा उल्लेख करून समाजात तेढ निर्माण केली. बी एन एस कायदा कलम १९२, ३५६, १९६ सह ६१ प्रमाणे दखलपात्र गुन्हा केलेला आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जीभेला चटके दिले पाहिजेत, असे विधान केले. बी एन एस कायदा कलम ४६, ५५, १९२, १९६ सह ६१ प्रमाणे गंभीर दखलपात्र गुन्हा केलेला आहे.
आरोपी संजय गायकवाड, तरविंदर सिंग मारवा, रवनीत बिट्टू, रघुराज सिंग, अनिल बोंडे यांनी आपापसात फौजदारी कट रचून संगनमत करून दखलपात्र गुन्हे केले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधातील विधाने टीव्ही वर प्रसारित केली. आरोपींच्या बोलण्यामध्ये व्यापक कटकारस्थान रचल्याचे दिसून येते. आरोपींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबत खोटी विधाने करून बी एन एस कायदा कलम ४६, ५५, १९१, १९२, १९६, १५१,३५२, ३५६ सह ६१ प्रमाणे दखलपात्र गुन्हा केला आहे, असे मोहन जोशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
व्हिडिओ वरून सकृतदर्शनी आरोपींनी दखलपात्र गुन्हा केल्याचे पुराव्यानिशी दिसून येत आहे. या गुन्ह्यांची माहिती मी, आपणास लेखी स्वरूपात देत आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाच्या ललिता कुमारी विरूद्ध उत्तर प्रदेश सरकार व इतर (२०१३) १४ एस.सी.आर ७१३ मधील न्यायनिवाड्याप्रमाणे एखाद्या पोलीस अधिकाऱ्यास दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यास सदर पोलीस अधिकाऱ्यास एफ.आय.आर. नोंदवून घेणे बंधनकारक आहे. या नुसार मी दिलेल्या लेखी माहितीच्या आधारे आरोपींविरोधात त्वरित एफ.आय.आर नोंदवावा आणि दोषींवर कायदेशीर कार्यवाही करावी. एफ.आय.आर नोंदवून न घेतल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होईल, असे मोहन जोशी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.