नवी दिल्ली:
तप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम येथे दुपारी 4 वाजता नागरी विमान वाहतुकीवरील दुसऱ्या आशिया-प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेला उपस्थित राहणार आहेत . यावेळी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.
पंतप्रधान सर्व सदस्य देशांद्वारे “दिल्ली घोषणापत्र ” स्वीकारल्याची घोषणा देखील करतील, जे या प्रदेशाच्या विमान वाहतूक क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्याच्या दिशेने एक दूरदर्शी पथदर्शक आराखडा आहे.
ही परिषद आणि दिल्ली घोषणापत्राचा स्वीकार हे आशिया प्रशांत नागरी विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षितता, सुरक्षा आणि स्थैर्य वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून यातून या प्रदेशातील देशांमधील सहकार्याची भावना अधोरेखित करते.
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या सहकार्याने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने नागरी विमान वाहतुकीवरील आशिया-प्रशांत मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन केले असून संपूर्ण आशिया-प्रशांत प्रदेशातील परिवहन आणि विमान वाहतूक मंत्री, नियामक संस्था आणि उद्योग तज्ञ यानिमित्ताने एकत्र येतील. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्य वाढवताना पायाभूत सुविधांचा विकास, स्थैर्य आणि कार्यबल विकास यासारख्या प्रमुख आव्हानांवर तोडगा काढण्यावर परिषदेत भर दिला जाईल.