पुणे:पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्यात आली आहेत. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.आता दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन केली जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. त्यामध्ये याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे असून या दोन्ही गावांची आता नगरपरिषद स्थापन होणार आहे. या दोन्ही गावांकडून अनेकवेळा याबाबींचा विरोध दर्शवण्यात आला होता. यासाठी गावकर्यांनी आंदोलन देखील केली.मात्र आता राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. यात या दोन्ही गावांचा उल्लेख नगर परिषद म्हणून करण्यात यावा, असं म्हटलं आहे. याच बाबत आता स्थानिक नागरिक काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिसूचनेत काय म्हटलं आहे?
राज्य सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की, ”महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ यांच्या कलम ३ चे पोट-कलम (३) चे खंड (अ) मध्ये प्राप्त अधिकारानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक अ-मध्ये उप विभाग येथे शासन उद्घोषणा क्रमांक पीएमसी- २०२२/प्र.क्र.४६८/नवि-२२, दिनांक ३१ मार्च, २०२३ रोजी प्रसिध्द केली असून महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करण्याचा आणि वगळलेल्या क्षेत्रासाठी नगरपरिषद स्थापन करण्याचा आपला इरादा जाहीर केला होता.”यात पुढे म्हटलं आहे की, ”अधिसूचनेच्या अनुषंगाने त्यामध्ये नमुद कालावधीत प्राप्त हरकती व सूचनांचा शासनाने विचार केला आहे. भारताचे संविधानाच्या अनुच्छेद २४३ थ च्या खंड (२) मध्ये नमूद केलेल्या बाबी विचारात घेता पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करणे क्रमप्राप्त आहे. आता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ (१९४९ चा ५९) यांच्या कलम ३ चे पोट-कलम (३) चे खंड (अ) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा व त्यांबाबतीत समर्थन करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, पुणे महानगरपालिका यांच्याशी सल्लामसलत करून व उक्त कलम ३ चे पोट-कलम (४) नुसार आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दी केल्यानंतर, यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र पुणे महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या सीमांमध्ये फेरफार करीत आहे.”