पुणे-शेजारील घराची दुसरी चावी चोरून घरात हळूच शिरुन सोन्याच्या दागिण्यांची चोरी करुन शेजारीण जात असे. दोन वेळा चोरी केल्यानंतर याचा सुगावा लागत नाही, अशी चाहूल लागल्याने ती पुन्हा चोरी करायला आली आणि घरमालकाने लावलेल्या सापळ्यात महिला चोर बेडरूममधील सीसीटीव्हीत कैद झाली. दुसर्या चावीच्या सहाय्याने ६ लाख २० हजारांचे दागिने चोरल्याप्रकरणी संबधित आरोपी महिलेवर सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता राठोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गौरव जयंत रेखी (वय ३०, रा. राधिका रॉलय सोसायटी, धायरी) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना ७ जुलै ते ९ सप्टेंबर २०२४ या दरम्यानच्या काळात राधिका रॉयल सोसायटी, धायरी येथे घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव रेखी यांच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दोन वेळा चोरी करुन ६ लाख २० हजारांचे सोन्या-चांदिचे तसेच हिर्याचे दागिने लांबविण्यात आले होते. सदनिकेचा मुख्य दरवाज्याचे लॉक न तोडता दागिन्याची चोरी कशी होते याचा उलगडा होत नसल्याने फिर्यादी रेखी यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली नव्हती. दरम्यान फिर्यादी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बाहेर गेले असता त्यांनी दरवाज्याचे दोन्ही लॅच लावून लॉक केले होते. संध्याकाळी ते परत आले असता त्यांनी दरवाजा उघडला असता त्याच्या लक्षात आले की दरवाजा एका लॅच मध्येच उघडला आहे. संशय आल्यामुळे फिर्यादी यांनी घरातील कपाटातील दागिने पाहिले असता त्यातील काही दागिने कमी असल्याचे त्यांच्या लक्षता आले. फिर्यादी रेखी पत्नीला फोन करुन घरी आली होती का, अशी विचारणा केली असता त्यांनी नाही म्हणून सांगितले. घरात अशा प्रकारे चोरी होते याचा उलगडा होत नसल्याने फिर्यादी गौरव रेखी यांनी बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावला आणि त्याचा ऍक्सेस मोबाईलवर घेतला.
आठ सप्टेंबर रोजी फिर्यादी यांच्या कुटुंबातील सर्वजण गावी गेले असतांना त्यांच्या मोबाईलवर सीसीटीव्ही घरात कोणी तरी आले असल्याचे समजले. यावेळी फिर्यादी यांनी मोबाईलमध्ये पाहिले असता त्यांच्या शेजारी राहणारी महिला घरातील बेडरुममध्ये असणार्या दागिण्यांची चोरी करतांना दिसून आली. आरोपी महिला अनिता राठोड या समोर राहायला आहेत. फिर्यादी यांच्या घराची दुसरी चावी चोरुन अनिता राठोड घरात शिरत असे आणि कपाट्यातील सोन्याचे दागिने चोरत असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निकम करत आहेत.