मुंबई, दि. 11 :- शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील. राज्यात 11 हजार 500 मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दीष्ट असल्याने कृषीपंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. महात्मा जोतीराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्यातील अडथळे सप्टेंबरअखेरपर्यंत दूर करण्यात येतील. केंद्रीय पणन, सहकार, कृषीमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित शेतकरी प्रतिनिधींच्या बैठकीत दिली.
राज्यातील शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, पणनमंत्री अब्दुल सत्तार, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, वित विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर सोयाबीन आणि कापसाच्या निर्यातीलाही परवानगी देण्यात येणार आहे. सोयाबीन व कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यांच्याकडूनही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र कर्जखात्यांवर बॅकस्तरावरील तांत्रिक अडचणींमुळे लाभ जमा झालेला नाही तसेच ज्या शेतकऱ्यांना बॅंकेच्या चुकीच्या माहितीमुळे कमी रक्कम प्राप्त झाली होती, त्यांची माहिती घेऊन लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पीकविमा संबंधी केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन याप्रकरणी शेतकरी हिताचा तोडगा काढण्यात येईल. यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांच्या व शेतजमीनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
राज्यसरकार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सकारात्मक आहे. केंद्र सरकारकडे शेतीशी संबंधित प्रलंबित अनुदान व कृषीमालाच्या हमी भाव, कांदा निर्यातबंदी व संबंधित प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शेतविहीर, ठिंबक-तुषार सिंचनाचे आणि फळबाग व सिंचन अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू आहे. शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात येणार असून सौरऊर्जेवर कृषी पंपाची संख्या वाढविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. महाडीबीटीअंतर्गत कृषी अवजारांचे अनुदान वितरित करण्यासाठी निधीची तरतूद केली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिली.
——0000000——-