पुणे, दि. ११: गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये ३४ जिल्ह्यातील ३२४ तालुक्यातील पात्र १३५ गोशाळांना १७ कोटी २१ लाख रुपये अनुदान स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, याकरीता महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचा पाठपुरावा आणि अशासकीय सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी यांच्या प्रयत्नामुळे निधी प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत राबविण्यात आलेल्या गोवर्धन गोवंश सेवा केंद्रामधील पशुधनासाठी आवश्यक असलेल्या वैरणीसाठी वैरण उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. देशी गोधन, गोवंशाची जतन व संवर्धन करण्यासाठी राज्यशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या अनुदानातून गोशाळांनी दुग्धोत्पादनास, शेती कामास, पशुपैदाशीस, ओझी वाहण्याच्या कामास उपयुक्त नसलेल्या,असलेल्या गाय, वळू व बैल व वय झालेले गोवंश यांचा सांभाळ करण्याकरीता पशुधनासाठी चारा, पाणी व निवाऱ्यांची सोय उपलब्ध देण्यात येत आहे.
राज्यात पशूंचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. गोसेवा आयोगाचे कार्यालय पशुसंवर्धन आयुक्तालयाचे इमारतीत सुरु करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम, १९९५ कायद्यानुसार संपूर्ण गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीवर प्रतिबंध करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकामासाठी, ओझी वाहण्यासाठी व पैदाशीसाठी उपयुक्त नसलेले गोवंशीय बैल व वळू यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आलेली आहे, अशी माहिती आयोगाचे सदस्य सचिव यांनी दिली आहे.