पुणे | प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “लोहगड किल्ल्यावरून ढकलून करण्यात आलेली केतन अग्रवालची हत्या अत्यंत धक्कादायक आणि अनाकलनीय आहे. समाज म्हणून या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी केवळ या गुन्ह्याच्या कायदेशीर तपासावरच नव्हे, तर त्यामागील सामाजिक कारणांचाही शोध घेण्याची गरज व्यक्त केली. “चांगल्या घरातील आणि सुशिक्षित तरुणांमध्ये अशी सूडबुद्धी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती का निर्माण होते, याचाही सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास आणि तपास झाला पाहिजे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी लोहगड किल्ल्यावरून सुमारे ४०० फूट खोल दरीत ढकलून हत्या केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या दोघांना न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यात तब्बल २,००४ फोन कॉल झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. अटकेनंतर चेतन चौधरीने आपल्या वडिलांकडे रडत घटनेविषयी खुलासा केल्याची माहितीही समोर आली आहे.
नसरापूरच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मृत्युदंडाची मागणी
याच पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणावरही कठोर भूमिका मांडली. या प्रकरणातील दोषी ६५ वर्षीय भीमराव कांबळे याला न्यायालयाने दोषी ठरवले असून, २९ जून रोजी शिक्षेचा निकाल अपेक्षित आहे.
“हे अत्यंत दुर्मिळ आणि क्रूर स्वरूपाचे प्रकरण आहे. या नराधमाला न्यायालयाने थेट फाशीची शिक्षा द्यावी, अशी राज्य सरकारची भूमिका असून न्यायालय ती मान्य करेल, अशी अपेक्षा आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
दोन महिन्यांत खटल्याचा निकाल; तपासाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणातील तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेचेही कौतुक केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी अवघ्या १५ दिवसांत तपास पूर्ण करून १,२०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर विशेष न्यायालयाने सुट्टीच्या दिवशीही सुनावणी घेत केवळ दोन महिन्यांत खटला निकाली काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. राज्यातील हा सर्वात वेगवान खटल्यांपैकी एक ठरल्याचे सांगत, अशा जलद न्यायामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

