नागपूर -भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळे यांच्या भरधाव कारने दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिली आहे. या घटनेला आता राजकीय वळण लागत आहे. या प्रकरणी विरोधकांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली असून कारवाईची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले, हिट अँड रन घटनेचा पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी या घटनेसंदर्भातील सर्व तथ्य जमा केले आहे. त्याआधारे या घटनेची चौकशी होईल. मात्र विरोधी पक्षांकडून या घटनेचे राजकारण केले जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपला लक्ष्य केले जात असून बावनकुळे यांना बदनाम केले जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
रविवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. या दुर्घटनेत दोन चारचाकी आणि एक दुचाकी वाहनाला संकेत बावनकुळे यांच्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. यावेळी संकेत बावनकुळे कारमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र गाडी ते चालवत होते की त्यांचा चालक चालवत होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच पोलिस हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधक करत आहेत.
ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल?
विजय वडेट्टीवार म्हणाले, आमदार जयकुमार गोरे यांनी तर यांनी तर दोन लोकांचा जीव घेतला, भरधाव गाडी चालवून. यांना पैशांचा माज आलेला आहे, सत्तेचा माज एवढा आलेला आहे. यांना लोकांच्या जिवाची पर्वा नाही, लोक मेली काय आणि गेली काय, यांना काही देणे घेणे राहिले नाही. मला कीव येते मुलगा गाडी चालवत होता, जर ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता तर जगातला कोणी मूर्ख माणूस आहे काय की नंबर प्लेट काढून गाडीमध्ये ठेवेल? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, यावरून स्पष्ट दिसते की पोलिसांनी इतक्या आंधळेपणाने एखाद्या आरोपीला पाठीशी घातले. म्हणजे मुलगा दारू प्यायलेला नव्हता, ड्रायव्हर दारू पिऊन होता तर मग नंबर प्लेट कशाला काढून गाडीमध्ये ठेवली? ड्रायव्हरला वाचवण्यासाठी कोणी नंबर प्लेट काढेल? वडिलांनी स्पष्ट केले आहे की गाडी मुलाच्या नावावर आहे, मग आरोपी मुलगा नाही? असा सवाल उपस्थित केला आहे.