डॉ. अरुण आंधळे स्वागताध्यक्षपदी; विचारवेध संमेलनाचे पंधरावे वर्ष
पुणे: बंधुता लोकचळवळीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त विश्वबंधुता साहित्य परिषद आणि रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील महिन्यात होणाऱ्या रयत विचारवेध संमेलनाच्या अध्यक्षपदी बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची, तर स्वागताध्यक्षपदी प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांची निवड झाली आहे, अशी माहिती विश्वबंधुता साहित्य परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे यांनी दिली.
प्रा. शंकर आथरे म्हणाले, “विचारवेध संमेलनाचे हे पंधरावे वर्ष आहे. बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांच्या अर्थशोध आणि बोध, मी पाण्याच्या जातीचा, बंधुतापर्व, प्रकाशपर्व, बंधुताचार्याची प्रकाशगाथा, आरपार बंधुता या साहित्यकृती प्रकाशित झाल्या आहेत. विविध विषयांवरील विपूल व वैचारिक लेखनही त्यांनी केले आहे. १८ व्या आणि २३ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी सातारा येथे झालेल्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. डॉ. प्रभंजन चव्हाण, डॉ. बंडोपंत कांबळे आणि प्रा. प्रशांत रोकडे यांनी संमेलनाच्या नियोजनात विशेष पुढाकार घेतला आहे.”