हे वार्षिक प्रकाशन हा एनएचएम मधील मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांबाबत अत्यावश्यक माहिती पुरवणारा महत्वपूर्ण दस्तावेज असून धोरण आखणी, प्रक्रिया सुधारणा आणि समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे : केंद्रीय आरोग्य सचिव
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2024
केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी आज नवी दिल्ली येथे “भारतातील आरोग्यविषयक स्थिती (पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ) 2022-23” जारी केले ,जे यापूर्वी “ग्रामीण आरोग्यविषयक आकडेवारी” म्हणून ओळखले जाणारे वार्षिक प्रकाशन आहे. 1992 पासून ते प्रकाशित केले जात आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या (एनएचएम ) विविध पैलूंवर विश्वासार्ह आणि खरी माहिती देणारा हा दस्तावेज असल्याचे अधोरेखित करत अपूर्व चंद्रा म्हणाले की, “हे वार्षिक प्रकाशन एनएचएम मधील मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांबाबत अत्यावश्यक माहिती पुरवणारा महत्वपूर्ण दस्तावेज असून धोरण आखणी , प्रक्रिया सुधारणा आणि समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त आहे.
ते पुढे म्हणाले की हा दस्तावेज मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता आणि कमतरता यासंबंधी सर्व राज्यांमधील विश्लेषण उपलब्ध करून देतो. राज्यांच्या गरजा, त्यांची प्राधान्य क्षेत्र तसेच धोरणे आणि लक्ष्यित मोहिमा आखण्यासाठी हा डेटा अत्यंत उपयुक्त आहे असे ते म्हणाले.ही आरोग्यविषयक आकडेवारी राज्यांच्या कामगिरीची विविध निकषांवर तुलना करण्यात मदत करते असे त्यांनी अधोरेखित केले.
आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली (HMIS) पोर्टलला प्रजनन आणि बाल आरोग्य (RCH) तसेच मंत्रालयाच्या इतर पोर्टल्सबरोबर जोडण्याची गरज केंद्रीय आरोग्य सचिवांनी व्यक्त केली जेणेकरुन आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार कमी होईल आणि डेटा वेळेवर अपलोड होईल आणि त्याचे काळजीपूर्वक विश्लेषण देखील सुनिश्चित होईल.
पार्श्वभूमी
1992 पासून, या प्रकाशनाने आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाबाबत 31 मार्च पर्यंतची सविस्तर वार्षिक आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. ही आकडेवारी आरोग्य क्षेत्रातील हितधारकांसाठी महत्त्वपूर्ण असून त्यांना देशभरातील आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचे प्रभावी नियोजन, देखरेख आणि व्यवस्थापन करण्यास मदत करते.
याची रचना दोन भागात केली आहे:
भाग 1 मध्ये स्पष्टतेसाठी नकाशे आणि तक्ते यांसारख्या दृश्य साधनांचा वापर करून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील माहितीसह भारताच्या आरोग्य सेवा व्यवस्थेची संपूर्ण माहिती दिली आहे.
भाग 2 नऊ विभागांमध्ये विभागलेला असून त्यात आरोग्य सुविधा, मनुष्यबळ आणि लोकसंख्याशास्त्रीय निर्देशकांवरील सखोल डेटा उपलब्ध आहे.
प्रकाशनात समाविष्ट असलेली माहिती धोरणकर्ते, आरोग्य प्रशासक आणि नियोजकांना आरोग्य सुविधा आणि मनुष्यबळाचे वितरण आणि पर्याप्तता याचे मूल्यांकन करण्यास सक्षम बनवते.
एकूणच,आरोग्य विषयक पायाभूत सुविधांचा विकास सर्व लोकसंख्या गटांच्या विशिष्ट आवश्यकतांशी सुसंगत आहे याची खातरजमा करण्यासाठी हे प्रकाशन एक आवश्यक संसाधन सामग्री असून देशभरातील अधिक लवचिक आणि प्रतिसादात्मक आरोग्य सेवा व्यवस्थेत मोठे योगदान देते.
31 मार्च 2023 पर्यंत, देशात एकूण 1,69,615 उपकेंद्रे (SC), 31,882 प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), 6,359 सामुदायिक आरोग्य केंद्रे (CHC), 1,340 उपविभागीय आणि जिल्हा रुग्णालये (SDHs), 714 जिल्हा रुग्णालये (DHs), आणि 362 वैद्यकीय महाविद्यालये (MC) ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात आरोग्य सेवा प्रदान करत आहेत.
या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांमध्ये 2,39,911 आरोग्य कर्मचारी (पुरुष + महिला) उपकेंद्रात, PHC मध्ये 40,583 डॉक्टर किंवा वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात, 26,280 विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी सामुदायिक आरोग्य केंद्रात तर 45,027 डॉक्टर आणि विशेषज्ञ उपविभागीय किंवा जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, देशभरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 47,932 परिचारिका, सामुदायिक आरोग्य केंद्रात मध्ये 51,059 परिचारिक कर्मचारी तर उपविभागीय किंवा जिल्हा रुग्णालयात 1,35,793 चिकित्सा सहाय्यक कर्मचारी कार्यरत आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाइटवरील दस्तऐवज विभागांतर्गत “हेल्थ डायनॅमिक्स ऑफ इंडिया (पायाभूत सुविधा आणि मानव संसाधन) 2022-23” हा अहवाल पुढील लिंकचा वापर करून पाहता येईल : https://mohfw.gov.in/.
अहवालाच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये या बाबी समाविष्ट आहेत :
- तुलनात्मक विश्लेषण : हे प्रकाशन 2005 आणि 2023 या दोन वर्षातील आरोग्य पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाची तुलनात्मक माहिती प्रदान करते, आणि 2022 ते 2023 या काळातील प्रगती आणि तफावत अधोरेखित करते.
- जिल्हा-निहाय माहिती : उपकेंद्रे (SC), प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC), सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC), उप-जिल्हा रुग्णालये (SDHs), जिल्हा रुग्णालये (DHs) आणि वैद्यकीय महाविद्यालये यांच्यासह आरोग्य सुविधांचे जिल्हा-स्तरीय तपशील पुरवते.
- ग्रामीण, शहरी आणि आदिवासी क्षेत्र केंद्रित : ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळाचा तपशील तसेच धोरण नियोजनासाठी लक्ष्यित अंतर्दृष्टी प्रदान करते.
- राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वर्गीकरण: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे वर्गीकरण लक्ष्यित उपचार प्रणालीत मदत करणाऱ्या मुख्य आरोग्य सेवा कामगिरी मूल्यांकनाच्या आधारे केले जाते.
- वापरकर्ता-अनुकूल ठळक मुद्दे : द्रुत संदर्भासाठी प्रमुख निष्कर्ष प्रारंभीच सारांशित केले आहेत.
- भागधारकांसाठी मार्गदर्शन : पायाभूत सुविधा आणि मानवी संसाधनांमधील अंतर आणि कमतरता ओळखून आरोग्यसेवा नियोजन आणि व्यवस्थापनासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणून कार्य करते.
या कार्यक्रमाला आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालक (राष्ट्रीय आरोग्य मिशन) आराधना पटनायक तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.