पुणे-पिसोळी येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.अविनाश धनाजी शिंदे (वय ३२, रा. येवलेवाडी), रोहित राजु चौधरी (वय २४, रा. येवलेवाडी), आकाश किशोर चौधरी (वय २९, रा. होळकरवाडी, शेवाळवाडी), विशााल किशोर चौधरी (वय २७, रा. येवलेवाडी), अभिजित किशोर चौधरी (वय २३, रा. देवाची ऊरुळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व सराईत गुन्हेगार आहेत.
त्यांचा म्होरक्या अविनाश शिंदे याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, जबरी चोरी, दरोड्याची तयारी असे एकूण १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या साथीदारांवरही खूनाचा प्रयत्न, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
याबाबत पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथक गुरुवारी रात्री गस्त घालत असताना पिसोळी येथील धर्मावत पेट्रोलपंपामागे काही गुन्हेगार एकत्र जमले असून ते दरोडा टाकण्याच्या तयारी असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलिसांनी या गुन्हेगारांना चारी बाजूने घेरुन पकडले.त्यांच्याकडून लोखंडी तलवार, मिरची पुड, दोन मोटारसायकली असा ९१ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.धर्मावत पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीने जमल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले पोलीस उपनिरीक्षक डिगोळे तपास करीत आहेत.