मंडळाचे गणेशोत्सवाचे १३१ वे वर्ष
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि अंजली काळकर यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना
पुणे: रथावर केलेली पुष्पवृष्टी, ढोल ताशांचा गजर…बैलजोड्यांनी केलेले सारथ्य अशा पारंपरिक थाटात मंडईकरांनी आपल्या लाडक्या शारदा गणपतीचे स्वागत केले. आले रे आले गणपती आले….गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया…आपला गणपती शारदा गणपतीचा एकच जयघोष करून फुलांनी सजवलेल्या त्रिशूळ-डमरू रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे आगमन झाले.
मंडळाचे गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष आहे. गणरायांची प्राणप्रतिष्ठापना मंडळाच्या वतीने साकारण्यात आलेल्या शिवालयात दुपारी १२ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या शुभहस्ते झाली. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, कार्याध्यक्ष अभय थोरात, उपाध्यक्ष मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, देविदास बहिरट, जयंत किराड, मधुकर सणस, अॅड.प्रताप परदेशी, सूरज थोरात, विकी खन्ना उपस्थित होते.
आगमन मिरवणूक अखिल मंडई मंडळ – मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक येथून पुन्हा बाबू गेनू चौक मार्गे उत्सव मंडप अशी संपन्न झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक, स्वराज्य, सामर्थ्य हे ढोल पथकाने वादन केले.
पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान झाले आहेत. मंडळाच्या वतीने यंदा ‘दगडांवर कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचे भव्य शिवालय’ ही सजावट करण्यात आली आहे. यामध्ये महादेवाची भव्य पिंड व त्यावर सतत जलाभिषेक हे सजावटीचे विशेष आकर्षण असणार आहे, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.