शिक्षक दिनानिमित्त खासगी क्लासेस आणि बालवाडी शिक्षकांचा सन्मान
पुणे-नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिलीच्या आधीची तीन वर्षे ही अतिशय महत्वाची मानली आहेत. त्यामुळे खासगी बालवाडी शिक्षकांनीही विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेत बदल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि मॉडर्न विकास मंडळाच्या विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त खासगी क्लासेस घेणाऱ्या गुरुजनांचा कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, मनिषा बुटाला, सागर शेडगे, नवनाथ जाधव, मकरंद टिल्लू, प्रज्ञा केसकर, मिताली सावळेकर यांच्या सह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी गेल्या कार्यकाळात सर्वसमावेशक असे नवीन शैक्षणिक धोरण देशात लागू केले. यामध्ये पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्य आधारित आणि मातृभाषेतून शिक्षण पद्धतीवर भर दिला आहे. त्यासोबतच पहिलीच्या आधीची तीन वर्षे ही मुलांच्या संगोपनासाठी अतिशय महत्त्वाची असल्याने, त्याअनुषंगाने शिक्षणात बदल केला आहे. त्याचा अभ्यासक्रम ही दिलेला असून, त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे खासगी शिक्षकांनीही विद्यार्थी घडविण्याच्या प्रक्रियेत बदल करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, आज संपूर्ण जग आपल्याकडे कुशल आणि प्रामाणिक मनुष्यबळ असलेला देश मोठ्या आशेने पाहत आहे. जर्मनी सारख्या देशाला आज कुशल आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य विद्यार्थ्यांमधील कलागुण विकसित होण्यासाठी त्या अनुषंगाने काम करावे, असे आवाहन केले.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. खासगी शिक्षकांच्या प्रतिनिधी म्हणून प्रज्ञा केसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक दिनी खासगी शिक्षकांनाही आवर्जून सन्मानित केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा बुटाला यांनी केले.