पौड दि. ६ (वार्ताहर)-
आंदगाव ( ता.मुळशी ) येथील शाळेत तब्बल १९ अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिक्षकानेच या मुलींचा विनयभंग केल्याचे समोर आले असून उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे (रा. लोणी काळभोर) याच्यावर पौड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आंदगांव येथे जिल्हा विद्या विकास मंडळ संस्था नावाने शाळा आहे. उपशिक्षक जालिंदर नामदेव कांबळे हा विद्यार्थिनींना शारिरीक मारहाण व शिकवताना अश्लिल भाषेत बोलतो. तसेच शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करतो.अशी माहिती शाळा व्यवस्थापनाला मिळाली. त्यानुसार पाच सप्टेंबर रोजी संस्थेच्या कार्यकरणी समितीमधील सदस्य शाळेत चौकशीसाठी गेले. त्यावेळी १९ विद्यार्थिनींनी सदस्यांना संबंधित शिक्षकाविषयी लेखी अर्ज दिले.
शाळेकडून देण्यात आलेल्या तक्रारीनुसार,जालिंदर कांबळे याने शाळेत खेळणाऱ्या एका मुलीच्या डोळ्याला पट्टी बांधत तिला मिठी मारली. त्यावेळी इतर विद्यार्थी ओरडल्याने त्याने तिला सोडले. कांबळे हा वर्गामध्ये विनाकारण विद्यार्थिनींच्या अत्यंत जवळ जावुन कानामध्ये बोलायचा व मोठ्याने कानात ओरडायचा. तसेच हाताला स्पर्श करून डोक्यावर डोके आपटत असे व त्यास विरोध केल्यास मुलींना मारहाण करायचा. शिक्षक जालिंदर कांबळे हा शिकवताना विनाकारण फळ्यावर मुका, किस, पप्पी असे शब्द लिहायचा. तसेच शिकवताना मामाने मामीला मळ्यात मिठी मारली, असे म्हणायचा. शाळेतील विदयार्थीनीना लज्जा उत्पन्न होते अशा स्वरूपाच्या तक्रारी केलेल्या आहेत.
जालिंदर कांबळेला पौड पोलिसांनी लोणी काळभोर येथून अटक केलेली असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.सदरची कमगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, संतोष जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, पोलीस उप निरीक्षक शीतल ठेंबे, पोलीस हवालदार रॉकी देवकाते, संतोष कालेकर, सिद्धेश पाटील,पोलिस नाईक दत्तात्रय अर्जुन, अनिकेत सोनवणे, रेश्मा साठे, चालक अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केलेली आहे.