लोक मिसळत आहेत मेधा कुलकर्णींच्या सुरात सूर म्हणतात हा तर जनतेचाच आवाज
पुणे: गणेशोत्सवात आवाजाच्या मर्यादा नियमानुसार ठेवावी आणि बीभत्स गाणी वाजवली जाणार नाही या गोष्टींचे काटेकोर पालन व्हावे असे आवाहन भाजपच्या राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गणेश मंडळांना केले आहे. एक व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी हे आवाहन केले. मंडळांच्या कोडकौतुकात एकीकडे लोकप्रतिनिधी दिसत असताना खासदार मेधा कुलकर्णी यांनी मंडळांना चार चांगले शब्द सुनावण्यासाठी पुढे येण्याचे धाडस दाखविल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे अर्थात कार्यकर्ते मात्र याबाबत पिछाडीवर असल्याचे दिसते आहे.
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, आपल्याला खूप मोठा आवाज जास्त काळासाठी ऐकायला लागला तर खूप त्रास होतो. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलं असतात. मोठ्या आवाजामुळे त्यांच्या कानांवर परिणाम होतो,त्यांच्या हृदयाची धडधड वाढते, त्यांचं आजारपण अजून वाढतं. त्यांच्या आरोग्यावरकाही वेळा अंशकालीन काही वेळा दीर्घकालीन परिणाम होतात. उत्सव असला तरी महिला, मुले, जेष्ठ नागरिक या सर्वांची काळजी आपल्याला घ्यायची आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, सगळ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, आवाजाची मर्यादा आपण नियमानुसार ठेवूया. आवाजाच्या मर्यादेसोबतच जी गाणी आपण वाजवतो ती आपल्या हिंदू देव-देवतांना आवडतील का याचा विचार करून आपण गाणी निवडूया. ढोल-ताशा पथक हे आपलं पारंपारिक वाद्य आहे. त्याच्यामध्ये रिदम आहे. आता खूप जण सुजाण झाले आहेत. वादकांची संख्या मर्यादित ठेवून त्याच्यामध्ये गोडवा टिकवला जातो. तसेच, आवाजाची मर्यादा आणि गाण्याची निवड याबाबत सर्व गणेश मंडळं काटेकोर राहतील अशी खात्री व्यक्त करून त्यांनी सर्व गणेश मंडळांना शुभेच्छा दिल्या.