हडपसर – पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणे गरजेचे आहे. मुली प्रमाणे मुलांना ही गुड टच बॅड टच शिकवणे गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार सोशल मीडिया म्हणजेच मोबाईलद्वारे काय चांगलं घेऊ शकतो, हे पालकांनी आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे, सकारात्मक गोष्टी व संस्काराचा पाया भक्कम केल्यास मुले चुकीच्या मार्गाला जात नाहीत. असे हडपसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपिका जवजाळ यांनी पालकांना मार्गदर्शन करताना मत स्पष्ट केले.
ससाणेनगर येथील न्यू इंग्लिश इंग्लिश स्कूलमध्ये पालक आणि विद्यार्थ्यांसाठी सामाजिक जाणीव जागृती या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळेस जवजाळ बोलते होते. याप्रसंगी न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन निलेश ससाणे ,माजी नगरसेवक योगेश ससाणे,अजित ससाणे,सागर ससाणे, दामिनी पथकाचे दिपाली गायकवाड,मंजुषा ढिगळे आदी उपस्थित होते. पुढे त्या म्हणाल्या आपली मुलं शाळेत येताना जाताना कोणाच्या संगतीमध्ये राहतात. याची विचारपूस केले जात नाही. शाळेची बॅगची तपासणी केली जात नाही, कोणतीही वस्तू मुलांना सहज उपलब्ध केली जात असल्याने, आपल्या परिस्थितीची जाणीव त्यांना होत नाही. सातत्याने मुला मुली सोबत संवाद करणे गरजेचे आहे.सध्याच्या काळात लैंगिक अत्याचाराच्या घटना पाहता, लैंगिक अत्याचाराबाबत याला वयाची मर्यादा राहिली नाही. गुन्हा करणाऱ्या व्यक्तीचा मानसिकता ही क्रूर पद्धतीने बदलत चालली आहे. त्यामुळे पालकांनी स्वतः जागृत होणे गरजेचे आहे.
माजी नगरसेवक योगेश ससाणे म्हणाले, पूर्वीच्या काळातले शिक्षक,विद्यार्थ्यांना छडी मारून शिक्षा द्यायची, त्यामुळे विद्यार्थी पुन्हा ती चूक करत नव्हता. चुकल्यावर ती आपल्याला कोणीतरी मारतं याची विद्यार्थ्यांना होती. मात्र आता किरकोळ शिक्षकांनी ओरडले तरी पालक शिक्षकांना जाब विचारायला येतात. त्यामुळे विद्यार्थ्याला शिक्षकाचे महत्व राहत नाही, याबाबत पालकांनी आपली जबाबदारी ओळखावी.