उद्या होणाऱ्या TET परीक्षेचा पेपर फुटला, परीक्षा रद्द

Date:

भिवंडीतून प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण पोलिसांच्या ताब्यात; परीक्षा परिषदेचा निर्णय- फेरपरीक्षेसाठी पुन्हा शुल्क लागणार नाहीत
मुंबई-राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे देशभरात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलिसांनी रचला सापळा, 3 जणांना एअरपोर्ट परिसरातून उचलले

TET पेपर फुटीप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (TET) चा पेपर लीक करणाऱ्या टोळीविरुद्ध भिवंडीत कारवाई झाली. कोनगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत लावलेल्या सापळ्यात 3 जणांना ताब्यात घेण्यात आले. कोनगावच्या डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी संदर्भात संशयित असल्याच्या गुप्त माहितीनंतर कोनगाव पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र, हे संशयित त्या ठिकाणी आढळले नाहीत. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासातच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आढळून आले. यानंतर, पोलिसांनी या तिन्ही आरोपींना भिवंडीत आणले असून याप्रकरणी भिवंडी कोनगाव पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.

फेरपरीक्षेसाठी 6 लाखांहून अधिक उमेदवारांना दिलासा
परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात उमेदवारांची कोणतीही चूक नाही. त्यामुळे ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवी तारीख दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. त्यांनी सांगितले की, ही परीक्षा पुन्हा घेण्यासाठी नियोजनाची सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
1028 केंद्रांवर पुन्हा होणार परीक्षा

राज्यातील 37 शहरांतील 1028 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी सुमारे 6 लाख 1 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे लाखो उमेदवारांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे.

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर काय म्हणाले?

शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, टीईटी परीक्षा पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठीच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या मते, नीट पेपरफुटीनंतर परीक्षा परिषदेने सर्व सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या. मात्र, भिवंडी परिसरात काही व्यक्तींकडे प्रश्नपत्रिका असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी करून प्रश्नपत्रिका खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हितासाठी परीक्षा रद्द करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेचे निवेदन, परीक्षा रद्द झाल्याची घोषणा

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवार, दि. 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1,028 केंद्रांवर आयोजित करण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2026 पुढे ढकलण्यात आली असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकत होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा सुरक्षित व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, दि. 27 जून 2026 रोजी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही व्यक्तींना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत माहिती असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानुसार भिवंडी पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकून तपासणी केली.

या प्रकरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी बोलावून पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान संबंधित व्यक्तींकडे आढळलेल्या काही प्रश्न आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) जून २०२६च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न समान असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पडावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याने दि. 28 जून 2026 रोजी नियोजित टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे. टीईटी परीक्षेच्या नव्या तारखेसह इतर अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून कळविण्यात आले आहे.

सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत; टीईटी पेपरफुटीनंतर अंबादास दानवे कडाडले

या पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त करत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. दानवे म्हणाले, “या संपूर्ण पेपरफुटीमध्ये सरकारचाच सहभाग आहे. या सरकारला एक साधी टीईटी परीक्षा देखील नीट घेता येत नाही. प्रत्येक वेळी सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत आणि सध्या संपूर्ण राज्य ‘भगवान भरोसे’ सुरू आहे.”
सरकारच्या भोंगळ कारभारावर टीका करताना दानवे पुढे म्हणाले, “एक गरीब विद्यार्थी परीक्षेसाठी वर्षाभरापासून दिवस-रात्र तयारी करतो. पण परीक्षेच्या अवघ्या दोन दिवस आधी जर असे पेपर फुटत असतील, तर विद्यार्थ्यांमधील परीक्षा देण्याचा उत्साह पूर्णपणे संपून जातो. याचा थेट परिणाम त्यांच्या मानसिकतेवर आणि निकालावर होतो.” ऐन परीक्षेच्या तोंडावर झालेल्या या घोळामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांमधून आणि पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

‘TET पेपरही फुटला… महायुतीचे पेपरफुटी मॉडेल कायम’; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

पेपरफुटी प्रकरणावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याची वेळ आल्याचा उल्लेख करत त्यांनी, “TET पेपरही फुटला… महायुतीचे पेपरफुटी मॉडेल कायम!” अशा शब्दांत सरकारवर निशाणा साधला आहे.

‘महाराष्ट्राची ओळख पेपरफुटीची झाली, ही लाजिरवाणी बाब’

विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राची ओळख ही शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमधील यशामुळे होती. मात्र, आज दुर्दैवाने महाराष्ट्राची ओळख पेपरफुटीमुळे होत असून ही राज्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.
त्यांनी म्हटले की, NEET पेपरफुटीचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडले होते. आता ठाण्यात टीईटीचा पेपर परीक्षा होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी फुटल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. लाखो विद्यार्थ्यांनी अनेक महिने रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षेची तयारी केली होती. मात्र, काही भ्रष्ट प्रवृत्तीमुळे त्यांच्या मेहनतीवर एका क्षणात पाणी फिरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

‘ही केवळ पेपरफुटी नाही, लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची चोरी’

वडेट्टीवार यांनी या घटनेला केवळ पेपरफुटी न म्हणता, “ही लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची, त्यांच्या कष्टांची आणि भविष्याची चोरी आहे,” असे म्हटले आहे.

सरकारी भरती परीक्षा असो किंवा पात्रता परीक्षा, वारंवार पेपरफुटी होत असताना सरकार मात्र नेहमीप्रमाणे चौकशीच्या घोषणा करण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली. प्रत्येक वेळी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले जाते, मात्र त्यानंतर पुन्हा दुसऱ्या परीक्षेचा पेपर फुटतो, यावरून दोषींना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याचे किंवा त्यांना कुणाचे तरी संरक्षण मिळत असल्याचे दिसून येते, असा आरोप त्यांनी केला.

‘सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारावी’

राज्यातील युवक आधीच बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत असल्याचे सांगत वडेट्टीवार यांनी महायुती सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली आहे.

तसेच, टीईटीचा पेपर नेमका कसा फुटला, त्यामागे कोणते रॅकेट कार्यरत आहे, त्याला राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण आहे का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

‘सूत्रधारांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे’

केवळ लहान-मोठ्या दलालांना अटक करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न न करता, या संपूर्ण रॅकेटमागील सूत्रधार आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
4.28 लाख विद्यार्थ्यांना फटका; पुण्यात सर्वाधिक उमेदवार

यंदाच्या महाटीईटी परीक्षेसाठी राज्यभरातून 4 लाख 28 हजार 122 उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 45 हजार 562 उमेदवारांचा समावेश आहे. परीक्षा रद्द झाल्याने अनेक महिन्यांपासून तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पेपरची विक्री सुरू असल्याची पोलिसांना माहिती : मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यात टीईटीच्या प्रश्नपत्रिकांची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या खबऱ्यांनी दिली होती. परीक्षेचा पेपर पैशांच्या मोबदल्यात विकला जात असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. या कारवाईत फुटलेली प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली असून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबतची माहिती तातडीने शिक्षण विभागाला देण्यात आली. त्यानंतर परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता धोक्यात आल्याने संपूर्ण परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पेपर नेमका कुठून बाहेर आला? तपास सुरू : पेपर नेमका कोणत्या यंत्रणेतून बाहेर आला, तो कोणाकडून लीक करण्यात आला आणि तो संशयितांकडे कसा पोहोचला, याचा शोध पोलीस घेत आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचाही तपास केला जात आहे.
यापूर्वीही टीईटी वादाच्या भोवऱ्यात : महाटीईटी परीक्षा यापूर्वीही मोठ्या गैरव्यवहारामुळे चर्चेत आली होती. उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. अनेक उमेदवारांचे गुण अवैधरीत्या वाढवून पात्र ठरवण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. त्या प्रकरणामुळे टीईटी परीक्षेची विश्वासार्हता आधीच धोक्यात आली होती. आता पुन्हा पेपरफुटी झाल्याने परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

18 हजार AI कॅमेरे, बायोमेट्रिक… तरीही पेपरफुटी

विशेष म्हणजे, यंदाची परीक्षा पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली होती. राज्यभरात पेपर क्रमांक 1 साठी 701 आणि पेपर क्रमांक 2 साठी 1,028 अशी एकूण 1,729 परीक्षा केंद्रे उभारण्यात आली होती. प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली होती. गैरप्रकार रोखण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर 18 हजार एआय-आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. राज्य व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण केले जाणार होते.

फेस रेकग्निशन, बायोमेट्रिक आणि मेटल डिटेक्टरची व्यवस्था : प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक पडताळणी, फेस रेकग्निशन आणि हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ‘फोटो व्ह्यू’ प्रणालीद्वारे बोगस उमेदवार, डुप्लिकेट अर्ज आणि मॉर्फ केलेले फोटो ओळखण्याची तयारीही करण्यात आली होती.
मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण परीक्षा केंद्रात नेण्यास बंदी घालण्यात आली होती. उमेदवारांना आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले होते.
कडक सुरक्षा व्यवस्थेनंतरही प्रश्नचिन्ह : एवढ्या व्यापक सुरक्षा उपाययोजना आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित देखरेख असूनही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याने राज्य परीक्षा परिषदेच्या संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता या पेपरफुटीमागील सूत्रधार कोण, प्रश्नपत्रिका नेमकी कोणत्या टप्प्यावरून बाहेर आली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यामुळे लाखो उमेदवारांना पुन्हा नव्या तारखेची प्रतीक्षा करावी लागणार असून, नवीन परीक्षा कधी घेतली जाणार याबाबत शिक्षण विभाग लवकरच अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

…तर राजीनामा द्या अन् संघात जा:RSS च्या कार्यक्रमाला गेलेल्या IPS विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरेंचा घणाघात

मुंबई-नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय...

सामाजिक न्याय भवनामध्ये गटई कामगारांना स्टॉलचे वितरण

पुणे, दि. २७ जून : अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील...

आहार व बोलण्यावरील संयमाने मिळते ‘स्वास्थ्य आणि मनःशांती’

गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांचे आवाहन  श्री सरस्वती कराड...

 श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी दर्शन

रोमा परांजपे यांच्या ‘सर्वं कृष्णार्पणम्‌’ सादरीकरणाला रसिकांची दाद पुणे :...