पुणे- पुण्यात कॉंग्रेसला खात्रीलायक विजय मिळवता येतील असे ३ मतदार संघ असल्याचे नेहमीच बोलले जाते. पुणे कॅन्टोन्मेंट,कसबा आणि पर्वती अशी या तीन मतदार संघाची नावे आहेत.मात्र याही वेळेस कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत कुरघोडीचे राजकारण शिगेला पोहोचले असून निवडून येणाऱ्या नेत्याला संपविण्याच्या नादात येत्या विधानसभेत पुणे कॅन्टोन्मेंटची सहज मिळू शकणारी जागा कॉंग्रेस घालवून बसेल असे स्पष्ट चित्र आता दिसून येऊ लागले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील कॉंग्रेसच्याच काही मंडळींनी पक्षविरोधी काम करून याचा मतदार संघात हात तोंडाशी आलेला विजय भाजपच्या गळ्यात आयतीच विजयाची माळ बनवून घातला होता. दरम्यान या ५ वर्षात त्यांना त्यांच्या पक्षाशी केलेल्या द्रोहाबद्दल भाजपने मात्र कोणतीही बक्षिसी दिली नाही. तरीही आता पुन्हा, येथून निवडून येऊ शकणाऱ्या माजी गृहराज्य मंत्र्यांना पाडण्याचे किंवा त्यांना उमेदवारीच मिळू न देण्याचे, गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मोठ्यास्तरावर उघड कारस्थान कॉंग्रेसमधूनच सुरु झाल्याचे दिसते आहे.
मातंग समाजाचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या विरोधात कॉंग्रेस मधील कधी काळी त्यांच्याच कार्यकर्ता असलेल्यानी आघाडी उघडली आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघावर बागवे यांची मजबूत पकड आहे. मात्र त्यांच्या पक्षातील काहीजण त्यांना खेचण्याचे जोरदार प्रयत्न करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे. आता येथून त्यांना डावलून अविनाश साळवे यांना उमेदवारी द्यावी असाही प्रयत्न सुरु झालेला आहे. पण विजयाची लकेर खेचून आणण्याची ताकद जेवढी बागवे यांच्यात आहे तेवढी अन्य कोणात नसल्याने हा मतदार संघ पुन्हा आयताच भाजपला मिळवण्याची आयतीच संधी कॉंग्रेस अंतर्गत राजकारणाने चालून आली आहे.बागवे यांच्या विरोधात त्यांचेच ठराविक कार्यकर्ते कोणत्या आमिषाला बळी पडून जातात ? कोण त्यांना ही आमिषे दाखवून विरोधात आघाडी उघडतात ? या रहस्याचा शोध घेऊन, समेटाचे यशस्वी धोरण हाती घेऊन येथील हे राजकारण पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी संपुष्टात आणले नाही तर भाजपशी टक्कर देऊन कॉंग्रेसला मिळू शकणारा हा मतदार संघ कॉंग्रेसच्या हातून निसटल्या शिवाय राहणार नाही हे निश्चित.
कॉंग्रेसला विजय मिळवून देऊ शकेल असा दुसरा मतदार संघ पर्वती विधानसभा मतदार संघ आहे येथे निवडून येऊ शकतात असे आबा बागुल यांना कायमच पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणात मात खावी लागल्याचे दिसले आहे. आघाडीच्या राजकारणात हा मतदार संघ येथे राष्ट्रवादीला दिला गेला. पण राष्ट्रवादीला येथे विजय मिळविता आला नाही आणि हा मतदार संघ आयताच भाजपच्या पथ्यावर पडला.आतापर्यंत भाजपच्या पदरात टाकलेल्या या मतदार संघात आता आबा बागुल अजूनही विजय खेचून आणू शकतात अशी शेवटची संधी मानली जाते. अर्थात या साठी आघाडीच्या वाटपात हा मतदार संघ कॉंग्रेसकडे घेण्यासाठी नेते किती जोर लावतात त्यावर याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
तिसरा मतदार संघ आहे कसबा विधानसभा मतदार संघ जिथे आता कॉंग्रेसचेच विद्यमान आमदार आहेत. रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या तावडीतून हा मतदार संघ कॉंग्रेस कडे खेचून तर आणला. पण लोकसभेच्या निवडणुकीपासून पुन्हा आता येथे देखील कॉंग्रेस अंतर्गत राजकारणाने मोठी उचल खाल्याचे दिसले आहे. धंगेकर मनसेतून आलेत आणि आमदार झालेत हे काहींना अजूनही मानवत नसल्याने आणि या मतदार संघात जर दीपक मानकर यांना अजितदादा गटाकडून उमेदवारी मिळाली तर हा मतदार संघ देखील कॉंग्रेसच्या हातून निसटण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.
खडकवासला,वडगाव शेरी मतदार संघात कॉंग्रेसचे अस्तित्वच उरलेले नाही, हडपसर मध्ये एकेकाळी आमदार आणि मंत्रीपद भूषविलेले शिवरकर सध्या अत्यंत कमजोर मानले जातात.शिवाजीनगरमध्ये देखील कॉँग्रेसचे अनेक जण गेल्या निवडणुकीच्या प्रसंगी भाजपात गेले, आता शिरोळे यांना फाईट देण्याची ताकद असलेला उमेदवार पक्षाकडे नाही. कोथरूड मध्ये देखील कॉंग्रेसचे फारसे अस्तित्व दिसत नाही.
उल्हास पवार, दीप्ती चौधरी, अनंत विठ्ठलराव गाडगीळ, मोहन जोशी असे आमदार राहिलेले आणि बाळासाहेब शिवरकर,रमेश बागवे असे मंत्री राहिलेले नेते पक्षाकडे असताना पक्षाची शहर पातळीवर अवस्था कठीण होत चालली आहे.ज्यास प्रदेश पातळीवरील नेते जबाबदार असल्याचे मानले जाते.ज्येष्ठत्व आणि नेतृत्व मानायचे नाही,पर्यायी नेतृत्व उभे करायचे नाही आणि आहे त्या नेत्यांना धूळ कशी चारता येईल याचेच राजकारण पक्षात सुरु राहिल्याने सत्ता जरी यदाकदाचित आली तरी पुणे मिळविणे कॉंग्रेसला कठीण जाईल अशी सध्याची स्थिती असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.