गृह विभागावर कंट्रोल ठेवण्यासाठी शिंदेंची खेळी?
मुंबई-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अत्यंत प्रभावीपणे राज्यात प्रचार – प्रसार सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योजनेचे नाव बदलून “माझी लाडकी बहीण योजना’’’’ केली, तर भाजपमध्ये आपल्या पद्धतीने ही योजना राबवली जात आहे. त्यामुळे योजनेच्या श्रेयवादावरूनसुद्धा महायुतीमध्ये तीनही पक्षांमध्ये वाद सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृह जिल्ह्यातील बदलापूरमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात गृह विभागाने योग्य भूमिका घेतली नाही. प्रकरण हाताळण्यात कसूर केल्याने राज्यभरात “लाडकी बहीण’’’’ योजनेवरून मुख्यमंत्र्यांसह सरकारवर प्रचंड टीका करण्यात आली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण पाहिजे त्याप्रमाणे हाताळले नसल्याने एकनाथ शिंदे यांना गृह जिल्ह्यातच जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शिंदेंकडून थेट गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव पदावर आपले विश्वासू इक्बालसिंह चहल यांची बदली केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जागावाटपावरूनही आतापासूनच महायुतीमध्ये धुसफूस सुरू असल्याने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात अंतर्गत वाद सुरू असल्याचे समजते. याचाच परिणाम एकमेकांच्या खात्यांतर्गत विकासाच्या आणि प्रशासकीय गंभीर कामांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट गृह विभागावर कंट्रोल ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चहल यांना अतिरिक्त कारभार देत गृह विभागात नियुक्त केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभा लढायच्या किंवा नाही अशा भाजपमध्ये अंतर्गत चर्चा होत्या, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी ७ खासदार निवडून आणल्याने भाजपच्या दिल्ली नेतृत्वाशी चांगले संबंध निर्माण झाले आहेत. त्याचा परिणाम राज्यातील महायुतीत पडायला लागला आहे. शिंदे यांची भाजपच्या दिल्ली नेतृत्वाशी दिवसेंदिवस तयार होत असलेल्या संबंधांमुळे फडणवीसांपुढे चिंता वाढली आहे. दरम्यान, यामुळे आता भाजप आणि शिंदेसेनेमधील राजकारण वाढीस लागण्याची शक्यता निर्माण झाल्याचेही यानिमित्ताने दिसत आहे.