पुणे-महापालिकेतर्फे बाणेर येथे आदिवासी, मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतीगृह बांधण्याचे काम सुरु असताना या कामाच्या निविदेबाबत तक्रारी करून अडथळा निर्माण करून उद्धट वर्तन करणाऱ्या काँग्रेस नेत्याच्या ‘खास’ व माहिती अधिकारात पटाईत समजल्या जाणाऱ्या,स्वतःला चाणक्य समजणाऱ्या महाभागाला, मराठी चित्रपट निर्मात्या असलेल्या भाजपच्या माजी नगरसेविका राजश्री काळे यांनी महापालिकेत चपलेने चोप चोप चोपले.यावेळी इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक पदाधिकारी देखील उपस्थित होता.या महाभागाला महिलेकडून चपलेने मारहाण झाली त्यावेळी तेथे भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक, गणेश घोष हे आले असता त्यांनी यामध्ये मध्यस्ती केल्याने या त्याची सुटका कशीबशी झाली. दरम्यान, या माहिती अधिकार कार्यकर्त्यांना काँग्रेस नेत्याच्या लेटरहेड वरून अनेक तक्रारी येथे स्वतः येऊन केलेल्या आहेत. या ‘नामचीन वजनदार’ महाभागाला महिला नगरसेविकेने मारहाण केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ, तर महापालिकेच्या अधिकारी वर्गात हास्याचे फवारे उडाले आहे.महापालिका आयुक्तांना या संदर्भात विचारले असता त्यांनी मात्र आपल्याला काही ठाऊक नाही, पण तुम्ही सांगताय म्हणून चौकशी करतो असे सांगून आपले अंग काढून घेतले. दरम्यान या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात राजश्री काळे यांनी तक्रार दिल्याची माहिती रात्री उशिरा समजली आहे. उद्या अधिकृत माहिती देऊ असे पोलिसांनी हि काल म्हटले आहे. गेली २ दिवस या दोघात भवन विभागातील वीरेंद्र केळकर या वादग्रस्त कार्यकारी अभियंता असलेल्या अधिकाऱ्यासमोर वादावादी होत होती, मात्र त्यांनीही या प्रकरणात तोंडाला कुलूप लावल्याचे दिसून आले.
वसतिगृहाच्या निविदेचा पाठपुरावा करण्यासाठी राजश्री काळे या सायंकाळी महापालिकेतील भवन विभागात आल्या होत्या. त्यावेळी या कार्यकर्त्याने ‘तुझे काम मी होऊ देणार नाही, कार्यादेश कसे निघतात ते मी बघतोच’ अशी धमकी दिली. तेथे त्यांच्यात शाब्दीक वाद झाल्यानंतर काळे निघून गेल्या.त्यानंतर काही वेळाने तो कार्यकर्ता एका अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसला, तेथे राजश्री काळे बसलेल्या असताना संतप्त काळे यांनी या कार्यकर्त्याला थेट चपलेने मारहाण सुरु केली. तो त्या केबिनमधून बाहेर पडून दुसऱ्या अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसला. काळे या तेथे जावून त्याला पुन्हा बेदम मारहाण केली.
बाणेर येथे एक एकर जागेवर महापालिकेतर्फे वसतीगृह बांधले जात आहे. त्याचे चौथ्या मजल्यापर्यंतच काम पूर्ण झाले आहे. शेवटच्या टप्प्यातील रंगकाम, स्वच्छतागृह, फरशी बसविणे यासह अन्य कामे करण्यासाठी दोन कोटी रुपयांची निविदा काढली आहे. त्यात पात्र ठरलेल्या ठेकेदाराविरोधात या कार्यकर्त्याने तक्रार केली. त्यावर भवन विभागाने या विधी विभागाकडे अभिप्राय मागितला आहे. या तक्रारीवरून दोघांमध्ये वाद झाला.
‘आदिवासी मुलांसाठी वसतीगृह बांधले जात असताना हा कार्यकर्ता मुद्दाम अडवणूक करत आहेत. आज माझ्याशी विनाकारण उद्धटपणे बोलून धमकी दिल्याने त्याला चपलेने मारहाण केली. त्याच्या त्रासाला सगळेच वैतागले आहेत.’
राजश्री काळे, माजी नगरसेविका (मराठी चित्रपट निर्मात्या )