जालना: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेला प्रचंड यशामुळे महाविकास आघाडी आता विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार करत असल्याचे दिसून येत आहे. यातच नेते मंडळीच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा सर्वाधिक फायदा हा महाविकास आघाडीतील उमेदवारांना झाल्याचा दिसून आले होते. त्यातच आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत देखील मराठा आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासंदर्भात देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. निवडणुकांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी आगामी निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. या संदर्भातल्या घोषणेपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण आणि मनोज जरांगे पाटील यांची राजकीय भेट झाल्याने सध्या राजकीय राज्याच्या राजकारणात याची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
बदलापूर घटनेवर देखील यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात फडणवीस यांना अपयश आले असून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. राज्यात सध्या विविध भागात गुन्हेगारी घटना घडत असून यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.