श्री वरदेन्द्र श्री राघवेंद्र स्वामी मठात श्री राघवेंद्र स्वामी ३५३ वा आराधना महोत्सवानिमित्त आयोजन
पुणे : लक्ष्मी रस्त्यावरील २५० वर्षे जुन्या पेशवेकालीन श्री राघवेंद्र स्वामींच्या मठामध्ये श्री राघवेंद्र स्वामी यांच्या ३५३ व्या आराधना महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महारथोत्सव संपन्न झाला. फुलांनी सजविलेला श्री राघवेंद्र स्वामी यांची प्रतिमा असलेला रथ भाविकांनी ओढला. पारंपरिक वेशात फुगड्या खेळत…गाणी म्हणत आणि टाळ-मृदंगाचा गजर करीत भाविकांनी उत्साहात महारथोत्सवात सहभाग घेतला.
लक्ष्मी रस्त्यावरुन हा रथ निघाला त्यानंतर कजरी चौकामार्गे पुन्हा मठापर्यंत रथ आला. बंगळूरु वरुन आलेल्या विशेष सुवासिक फुलांनी आणि चारही बाजूंना केळीचे खुंट लावून रथ सजविण्यात आला होता. मंत्रालयचे (आंध्र प्रदेश) पीठाधीश १०८ डॉ. श्री श्री सुबुधेंद्र तीर्थ स्वामी यांच्या मार्गदर्शनातून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील श्री वरदेन्द्र श्री राघवेंद्र स्वामी मठात श्री राघवेंद्र स्वामी ३५३ व्या आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात तीन दिवस पूर्व आराधना, मध्य आराधना आणि उत्तर आराधना झाली.
मठाचे व्यवस्थापक दत्तात्रेय जोशी म्हणाले, राघवेंद्र स्वामी यांच्या ३५३ व्या आराधना महोत्सवानिमित्त मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी सुप्रभात सेवा, १०८ लिटर दुधाचा अभिषेक, अलंकार, महामंगल आरती, अन्नदान सेवा, दासवाणी आणि सायंकाळी सहा वाजल्यानंतर रथोत्सव, स्वस्ती वाचन, ढोल उत्सव, महामंगल आरती, अष्टोत्तर आरती, पारायण आदी कार्यक्रम झाले.