मुंबई-बदलापूर येथील शाळेत मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर झालेले आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा संशय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कालचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. त्याचा लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. हे व्हायला नको होते. मंत्र्यांनी आंदोलकांना समजावले. त्यांच्या मागण्याही मान्य केल्या. पण त्यानंतरही ते माघार घेत नव्हते. त्यांना केवळ सरकारला बदनाम करायचे होते,अशा घटनेचे राजकारण करणारांना लाज वाटली पाहिजे , तिथे आंदोलनाला ट्रक भर भरून लोक आले होते असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “बदलापूर येथील झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणातील जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारचे निर्देश कालच पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कारवाई देखील सुरू करण्यात आली आहे. आरोपीवर जे काही कलम आहेत, पोक्सो असेल कठोरातील कठोर कलम आरोपीवर लावण्याचे निर्देश दिले आहेत.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी फास्ट ट्रॅकवर नेण्यात आली आसून एसआयटी नेमण्यात आली आहे. तसेच ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाईमध्ये दिरंगाई केली त्यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे या परिवाराच्या मागे संपूर्ण सरकार आहे आणि या कुटुंबाला जे काही सहकार्य लागेल ते संपूर्ण सहकार्य सरकार करेल.”
संस्थाचालकांशी चर्चा करून संस्थेतील मुलींना सांभाळण्यासाठी तिथे महिला कर्मचारीच असल्या पाहिजेत तसेच या सुचनांचे पालन जे कोणी संस्थाचालक करत नसतील त्यांच्यावर देखील कठोर कारवाईचे निर्देश शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहेत. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून कठोरातील कठोर कारवाई तसेच कठोर नियम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
बदलापूर घटनेविरोधात रेल्वे स्थानकावर उतरत लोकांनी आंदोलन केले होते त्यामुळे येथील रेल्वे व्यवस्था विस्कळीत झाली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “या आंदोलनाने दुर्दैवाने लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला. 9 तास रेल्वे बंद होती हे व्हायला नको होते. त्यातही ज्येष्ठ नागरिक होते, महिला होत्या, लहान मुलं होती.” पुढे बोलताना ते म्हणाले, “कालचे आंदोलन पॉलिटिकल मोटीव्हेटेड होते. कारण या आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढे होते आणि बाहेरून गाड्या भरून आंदोलनकर्ते आले होते. यावेळी या आंदोलकांच्या सगळ्या मागण्या मंत्र्यांनी पूर्ण केल्या तरी हे मागे हटायला तयार होत नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती.”
विरोधकांवर निशाणा साधतान मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “राजकारण करण्यासाठी खूप मुद्दे आहेत, तिथे राजकारण करा . मात्र विरोधकांनी या चिमुकलीच्या प्रकरणावरून राजकारण सुरू केले. यांना लाज वाटली पाहिजे. हे आंदोलन ठरवून करण्यात आले होते, यांना लाडकी बहीण योजना खुपत आहे. लाडकी बहीण नको तर सुरक्षित बहीण पाहिजे असे नारे देण्यात आले होते. मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे.”