बदलापूर- येथील 2 अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदे नामक आरोपीला न्यायालयाने 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे काल मंगळवारी बदलापुरात तीव्र आंदोलन झाले होते. आंदोलकांनी दिवसभर रेल्वे रोको केला होता. त्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला होता. अखेर पोलिसांनी लाठीमार करून या आंदोलकांना हुसकावून लावले होते. तत्पूर्वी, दिवसभरात दोनवेळा आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटत आहेत.
बदलापूर येथील एका नामाकिंत शाळेमध्ये साडेतीन वर्षांच्या 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे. अक्षयला बुधवारी सकाळी येथील कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी पक्षातर्फे वकील अश्विनी भामरे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी या प्रकरणातील पुरावे व गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीची पोलिस कोठडी गरजेची असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार कोर्टाने आरोपीला 24 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
या प्रकरणाची वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वात एसआयटी चौकशी होणार आहे. या सुनावणीवेळी न्यायालय परिसरात मोठा जमाव जमला होता. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. दुसरीकडे, या प्रकरणाचे बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यभर आंदोलने होत आहेत.