निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या नेतृत्वात महाआरोग्य शिबीराचे यशस्वी आयोजन
पुणे ( दि १५): आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असल्याने अनेकदा गंभीर आजारांचा सामना करावा लागतो, ही परिस्थिती लक्षात घेत भाजपा कसबा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. गेली १५ दिवसांपासून अविरतपणे सुरु असणाऱ्या शिबिरात १२ हजार ६९२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांना चष्म्यांचे मोफत वाटप देखील करण्यात आले.
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनानिमित्त १ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध १५ ठिकाणी आरोग्य शिबीर राबवण्यात आले. उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या विशेष सहकार्यातून १ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या या शिबिराचा आज १५ ऑगस्ट रोजी समारोप झाला. महिलांसाठी कर्करोग तपासणी, तोंडातील कर्करोग तपासणी, डोळ्यांची तपासणी आणि मोफत चष्मे वाटप, दंत तपासणी, छातीचा एक्स-रे, रक्त तपासणी, कोलेस्ट्रॉल, बीपी, शुगर तपासणी आदी १०,५०० रुपये पर्यंतच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. यासोबतच गरज असणाऱ्या नागरिकांना पुढील उपचारांसाठी हेमंत रासने यांच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिबीर यशस्वी करण्यासाठी मतदारसंघातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले.