नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रयत्नशील-उपमुख्यमंत्री
पुणे, दि. १५: केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून शहरातील रस्ते, उड्डाणपुलांची कामे करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याकरीता प्रयत्नशील आहे, याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन, नागरिकांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्यावतीने सिहंगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकात उभारण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., मुख्य अभियंता युवराज देशमुख आदी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, राज्य सरकारच्यावतीने केंद्रशासनाकडून राज्याच्या विकासाकरीता मोठ्या प्रमाणात निधी आण्याचे काम करण्यात येत आहे. राज्यात रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. राज्यात सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरीता उपमुख्यमंत्री कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विकास कामे करतांना पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ, पुणे महानगर विकास प्राधिकरण, कॅम्प आदी यंत्रणेत समन्वय साधून कामे करावी लागतात. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विविध भागात मेट्रोचे जाळे निर्माण करण्यात येत आहे.
यापूर्वीदेखील चांदणी चौकातील पुल उभारुन वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे. पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे लोकार्पण करण्यात आले आहे. बाह्यवळण मार्गाला गती देण्याचे काम सुरू आहे. सिंहगड रोडवरील नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर असून येत्या वर्षभरात ते पूर्ण करण्यात येईल, याकरीता ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुण्याच्या लोकसंख्येत वाढ होत असून पाणी, वाहतूक अशा विविध पायाभूत समस्या निर्माण होऊन नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे पुणेकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन ते इच्छितस्थळी वेळेत पोहोचले पाहिजे, याकरीता प्रशासन प्रयत्नशील आहे नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास कमी करण्याकरीता प्रशासन प्रयत्नशील आहे. येत्या काळात वाहतूक कोडींचा प्रश्न मार्गी लावण्याकरीता आढावा बैठक घेण्यात येईल.
खडकवासला धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सिहंगड रोडवरील काही भागात पुरपरिस्थिती निर्माण होते. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरीता या भागात कायमस्वरुपी मार्ग काढण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेने एकतानगर येथील सामूहिक विकास क्षेत्राविषयी (कलस्टर डेव्हल्पमेंट) सादर केलेल्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींनी कामे करतांना राडारोडा नदीपात्रात टाकू नये. नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारे बांधकाम करु नये, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.
पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी एक आगळेवेगळी भेट
राज्याची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी असलेल्या पुणे शहराच्या पायाभूत विकासात भर पडत असून आज सिहंगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांना स्वातंत्र्यदिनी एक आगळेवेगळी भेट देण्याचा प्रयत्न आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे श्री.पवार म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आजपर्यंत ३५ लाख माता-भगिनींना लाभ
महिला सबलीकरणाकरीता राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास ३५ लाख माता-भगिनींच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून प्रत्येकी ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसात ५० लाख महिलांच्या खात्यात लाभ जमा करण्याच्या प्रयत्न आहे. त्यामुळे महिलांच्या मनात समाधानाची भावना दिसून येत आहे. येत्या १७ ऑगस्ट रोजी बालेवाडी येथे या योजनेचा राज्यस्तरीय लाभ हस्तांरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असेही श्री. पवार म्हणाले.
श्रीमती मिसाळ म्हणाल्या, नागरिकांची गैरसोय टाळून त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील पुलाचे काम करण्यात येत आहे. आगामी काळात या ठिकाणाहून जाणाऱ्या मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या पिलरचे कामही करण्यात आले आहे. यापुढेही लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मिळून शहरात विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही श्रीमती मिसाळ म्हणाल्या.
डॉ. भोसले म्हणाले, सिहंगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम चित्रपटगृहादरम्यान उड्डाणपूल बांधण्यात येत असून त्यापैकी आज राजाराम पुलाजवळ ५२० मी. लांबीच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या पुलामुळे वाहतूक कोंडी सुटणार असून नागरिकांचे इंधन व वेळेची बचत होणार आहे. उर्वरित पुलाचे कामही लवकरात पूर्ण करण्यात येणार आहे, असेही डॉ. भोसले म्हणाले.