‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात
पुणेः पंतप्रधानांचे स्वप्न हे देशाला विकसित करण्याचे आहे. भारत त्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. अग्निविर योजनाही त्याचाच भाग आहे. भारताच्या प्रतिष्ठीत सैन्यात सेवा देऊन जेव्हा हे ‘अग्निवीर’ समाजात परततील तेव्हा, समाजातील शिस्त आणि समतोल देखील वाढेल. परिणातः देशातील भावी पिढी अधिक शिस्तप्रीय व जबाबदार होण्यास मदत होईल. तसेच देशप्रेम हे एक दिवसीय असू नये तर ते वर्षभर कार्यरत असावे,असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल विजय पिंगळे यांनी केले. ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे भारताच्या ७८व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी, व्यासपीठावर एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, नीता पिंगळे, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.डाॅ.कराड यावेळी म्हणाले, भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. अनेकांनी दिलेल्या बलिदानामुळे आज आपण इथवर पोचलो आहोत. त्यामुळे, स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्यविरांसह देशाच्या प्रगतीत हातभार लावणाऱ्या शेतकरी, कामगार वर्गाचेही स्मरण करायला हवं. अशात विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची मुख्य जबाबदारी ही युवकांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे, हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी युवकांना कौशल्यात्मक शिक्षण पुरवून नवे स्टार्टअप्स उभारणीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. ‘मॅनेट’ इमारतीच्या प्रांगणात यंदाचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच, यावेळी क्रीडा स्पर्धांत विद्यापीठाला पदक मिळवून देणाऱ्या प्रा.आदित्य केदारी व प्रांजली सुरदुसे हिचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुत्रसंचलन व आभार ‘मॅनेट’च्या कॅडेट्सतर्फे करण्यात आले.
चौकट’स्वातंत्र्याची सायकल यात्रा’ मोहिमेस प्रारंभस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डाॅ.सुराज भोयार यांच्या पुढाकाराने “स्वातंत्र्याची सायकल यात्रा” या हरित व नशामुक्त भारताचा संदेश देणाऱ्या सायकल रॅलीला यावेळी मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेताना निरोगी व सदृढ आरोग्यासाठी रोज सायकल चालविण्याचे आवाहन व संदेश दिला.