पुणे-महिलांमध्ये मला उत्साह दिसत आहे. काल पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांच्या खात्यात डिबीटीद्वारे पैसे जमा झाले. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले, त्यांच्या चेहऱ्यावर मला आनंद, समाधान दिसले. गरीब घटकाला सर्व जाती धर्मातल्या आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या वर्गांकरता आम्ही मदत करतोय. त्यामध्ये मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळ्यांच योगदान आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
पुण्यात सिंहगड रोडवरील पुलाच उद्घाटन अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले. त्यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातही माहिती दिली. अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही आणली. त्याचा आनंद आहे. आता 17 तारखेला मोठा कार्यक्रम पुण्यात घेत आहोत. अनेक टीका झाल्या पण बुधवारी 35 लाख माय बहिणीच्या खात्यात पैसे जमा झाले. तसेच आज आणि उद्या 50 लाख महिलांना पैसे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 1.25 कोटी महिलांच्या खात्यात महिन्याअखेर आम्ही पैसे देणार आहोत. ‘बोले तैसा चाले त्याची वांदावी पाऊले’, असे आमचे सरकार आहे.
महायुतीमध्ये आमच्यात कुठलाही वाद नाही. एकोप्याने महायुती म्हणून आम्ही सरकार चालवतोय. मागे माझी प्रचंड बदनामी करण्यात आली. वेशभूषा, नाव बदलून जातो म्हणून. मी तर आव्हान दिले आहे, मी कुठे नाव बदलून गेलो. एवढ आई-वडिलांनी मला सुंदर नाव दिले. त्याचा मला अभिमान आहे. मी नाव का बदलू?, असा सवाल अजित पवार यांनी केला आहे.
दरम्यान अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, माझे म्हणणे आहे की आम्ही कामाची माणसे आहोत. विकास साधणारी माणसे आहोत. त्यापेक्षा आरोप-प्रत्यारोपात रस नाही. आता मी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही एकत्र जळगावला गेलो होतो. एकत्र सभा घेतली. एकत्र परत आलो. विरोधकांकडे दुसरा मुद्दा राहिलेला नाही. बदनामी करतायत, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरु आहे, त्याबद्दल मला बोलायच नाही, असे अजितदादांनी म्हटले आहे.