पुणे, दि. ६: जिल्ह्यातून ऑलिम्पिकमध्ये यश मिळविणारे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी गुणवान आणि होतकरू खेळाडूंवर लक्ष केंद्रित करुन त्यानुसार स्पर्धांचे आयोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा क्रीडा परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोलनकर, महेश चावले, महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशनचे राजेंद्र मागाडे यांच्यासह जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धा भरविताना पायाभूत सुविधांवर आवश्यक तेवढाच खर्च करुन जास्तीत जास्त खर्च खेळाडूंवर करण्यावर लक्ष द्यावे. अनावश्यक बाबींवर खर्च न करता खेळाडूंचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करावा. स्पर्धांसाठी चांगली बक्षीसे, निवास, भोजन व्यवस्था करण्यात यावी. अद्ययावत साधने, तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासह आहार तज्ज्ञ, क्रीडा मानसशास्त्र आदींची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करावीत, आदी सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्य शासनाचे ‘मिशन लक्ष्यवेध’ हे महत्त्वाकांक्षी अभियान असून त्यासाठी जिल्ह्याचे उत्कृष्ट योगदान राहील यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी जिल्ह्यातून निवडलेल्या पाच खेळांवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक खेळातून प्रत्येकी चार ते पाच असे एकूण शंभर उत्कृष्ट खेळाडू तयार करुन ते पुढील निवडीसाठी जातील असे नियोजन करा, असेही ते म्हणाले.
क्रीडा विभागासाठी जिल्हा नियोजन समितीतून २८ कोटी रुपयांचा नियतव्यय राखून ठेवण्यात आला असून त्यापैकी १० टक्के म्हणजेच २ कोटी ८० लाख रुपयांचा निधी ‘मिशन लक्ष्यवेध’ साठी राखून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे चांगले खेळाडू निर्माण होतील, असा विश्वासही डॉ. दिवसे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी श्री. कसगावडे यांनी २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पुणे महानगरपालिका, पिंपरी- चिंचवड मनपा तसेच पुणे जिल्ह्यात आयोजित करावयाच्या क्रीडा स्पर्धा, त्यासाठीचा अंदाजित खर्च, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आदींबाबत सादरीकरण केले.