बदली विरोधात मॅट मध्ये केले होते अपील..निकालाने दिली महापालिकेच्या राजकारणाला चपराक
पुणे: – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पुणे महापालिकेतील चार उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपायुक्त चेतना केरुरे, आशा राऊत आणि संतोष वारुळे, प्रसाद काटकर यांचा समावेश होता दरम्यान आता चेतना केरूरे आणि आशा राऊत यांना पुन्हा एकदा महापालिकेच्या उपायुक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महापालिका मधील आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्यांचा धडाका लावला होता. त्याआधी पुणे महापालिकेतील आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर उपायुक्तांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये चेतना केरुरे आणि आशा राऊत यांचा समावेश होता.
दरम्यान राऊत आणि केरुरे यांची बदली केली होती तरी त्यांना नियुक्तीच्या प्रतिक्षेत ठेवले होते. कारण आपला पुणे महापालिकेत उपायुक्त या पदावर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला नाही, तरी बदली करण्यात आली, या शासनाच्या निर्णया विरोधात आशा राऊत आणि चेतना केरूरे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये अपील केले होते. नुकतेच न्यायाधिकरणाने याबाबत आदेश जारी करत राऊत आणि केरूरे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. तसेच सरकारला याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार सरकारने राऊत आणि केरुरे यांची पुणे महापालिकेत उपायुक्त पदी नियुक्ती केली आहे. आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून अहवाल देण्याचे आदेश शासनाचे अवर सचिव अ. का. लक्कस यांनी जारी केले आहेत.
