पुण्याच्या एम. व्ही. आदित्यची ‘आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड 2024’ स्पर्धेत सुवर्ण कामगिरी–
–तब्बल 23 वर्षा नंतर ‘आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड 2024’ स्पर्धेत भारताने मिळवली आघाडी
पुणे : श्री चैतन्य टेक्नो स्कूल, बावधन, पुणे च्या एम. व्ही. आदित्य या विद्यार्थ्याने इंग्लंड येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड (IMO) 2024’ या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवीत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. एम. व्ही. आदित्य याने वैयक्तिकरित्या IMO मध्ये ४थे स्थान मिळवले आहे.जे एका भारतीय सहभागी स्पर्धकांसाठी आतापर्यंतचे सर्वोच्च स्थान आहे. यापूर्वी २००१ मध्ये, भारताची सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी ७ व्या स्थानावर होती, जी शशांक शर्मा याने गाठली होती. तर आज तब्बल २३ वर्षांनंतर, एम. व्ही. आदित्यने वैयक्तिकरित्या IMO मध्ये ४थे स्थान मिळवीत पुन्हा एकदा भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. सध्या आदित्य हा जगात ५ व्या क्रमांकावर तर भारतात अव्वल स्थानावर आहे.
विशेष म्हणजे, ‘आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड (IMO) 2024’ स्पर्धेत भारताने ४ सुवर्ण व १ रौप्य पदक मिळवीत घासघाशीत कामगिरी केली आहे. यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोशल मिडियावर पोस्ट शेयर करीत अभिनंदन देखील केले आहे. पंतप्रधान म्हणाले की, ‘“आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमधील सर्वोत्तम कामगिरीमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आमच्या संघाने ४ सुवर्ण आणि १ रौप्य पदक आणले आहे. हा गणिती पराक्रम इतर अनेक तरुणांना निश्चित प्रेरणा देईल आणि गणिताला अधिकाधिक लोकप्रिय बनविण्यात मदत करेल.”
दरम्यान, एम. व्ही. आदित्य हा सध्या श्री चैतन्य टेक्नो स्कूल, बावधन, पुणे येथे १२ वी इयत्तेत शिकत आहे. त्याने मिळविलेले यश हे त्यांची वैयक्तिक प्रतिभा आणि भारतीय गणिताची वाढती ताकद या दोन्ही गोष्टी प्रतिबिंबित करते. त्याच्या या कामगिरी बद्दल आदित्यच्या शाळेने देखील कौतुक केले आहे. मागील वर्षी श्री चैतन्य टेक्नो स्कूल, बावधन, पुणेच्या इयत्ता ७ वी मधील सिद्धार्थ चोपडा या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड (IMO) 2023 मध्ये जपानमध्ये झालेल्या स्पर्धेत जगात ९ व्या क्रमांकावर रौप्य पदक जिंकले होते.