मुंबई-विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे उद्धवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्याला यापूर्वी शरद पवारांनी विरोध केला होता. आता काँग्रेसनेही उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. शुक्रवारी (१९ जुलै) मुंबईतअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी खासदार व आमदारांची बैठक पार पडली.झालेल्या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाविकास आघाडी हाच विधानसभेसाठी चेहरा असेल, असे स्पष्ट करण्यात आले.
उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा उद्धव ठाकरे आहेत, असे जाहीर केले आहे. शुक्रवारी सकाळी ते उद्धव यांचे नाव न घेता म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर काही तासांनी झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत उद्धव यांना मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून स्वीकारण्यास एकमताने नकार देण्यात आला. आपल्याला दिलेले मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन भाजप पाळत नाही, असा आरोप करून २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली होती, हे विशेष. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी राजीव गांधींची जयंती मुंबईत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत साजरी केली जाणार आहे. त्याच दिवशी राहुल विधानसभा प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दिली.
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत सर्वांना त्याची माहिती मिळेल, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. ज्या ७ आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली त्यात झिशान सिद्दिकी, जितेश अंतापूरकर, सुलभा खोडके, शिरीष चौधरींची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय अन्य तीन आमदारांवरही पक्षाने कठोर कारवाई केली आहे. मात्र त्यांची नावे आताच सार्वजनिक करणे योग्य होणार नाही, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
लोकसभेला काही जागांचा निर्णय दिल्लीश्वरांनी घेतला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्याचे दिसत आहे. के. सी. वेणुगोपाल, चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व पटोलेंच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब येथे काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची व टिळक भवनात वेणुगोपाल, चेन्नीथला, पटोलेंची बैठक टिळक भवनात झाली. त्याची माहिती देताना पटोले म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करून लवकरच मविआची जागावाटप बैठक होईल. त्यात राज्यपातळीवरील नेत्यांनाच सर्व अधिकार असतील, असे काँग्रेस श्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे.
लोकसभेला उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीला मोठे यश मिळाले. त्याचा महाराष्ट्रातील विधानसभेला फायदा घेण्याचा प्रयत्न आमदार अबू आझमी यांनी सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शुक्रवारी वांद्रे पश्चिममधील रंगशारदा सभागृहात हॉल (वांद्रे, पश्चिम) येथे उत्तर प्रदेशातील ३१ सपा खासदारांचा सत्कार केला. त्यांनी महाविकास आघाडीपासून वेगळे होऊन स्वतंत्रपणे विधानसभा लढण्याचे स्पष्ट संकेतही दिले. यूपीमध्ये यशस्वी झालेल्या पीडीएच्या (मागास, दलित, अल्पसंख्याक) फॉर्म्युल्यावर लढण्याची त्यांची तयारी आहे, असे स्पष्टपणे दिसून आले.
महाराष्ट्रात समाजवादी पार्टीचे दोन (अबू असीम आझमी आणि रईस शेख) आमदार आहेत. या वेळी त्यांना महाराष्ट्रात किमान १०-१२ जागांवर उमेदवार उभे करायचे आहेत. यातील बहुतांश विधानसभेच्या जागा मुस्लिमबहुल आहेत. काँग्रेस आणि उद्धवसेना आधीच मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघांवर दावा करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सपाला केवळ २ ते ४ जागा देऊ शकते, अशी स्थिती आहे.