पुणे-मद्यपान केलेल्या अल्पवयीन मुलाने 10 ते 12 वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी (दि.10) पहाटेच्या सुमारास गुलटेकडी परिसरातील महर्षीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी आरोपी अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शेजारी राहणार्या लोकांनी त्याला कामाबद्दल हिणवल्यामुळे रागातून वाहनांची तोडफोड केल्याची कबुली अल्पवयीन आरोपीने दिली आहे. अल्पवयीन मुलाने दहशत निर्माण करण्यासाठी वाहन तोडफोड केली आहे.
महर्षीनगरमधील क्रिसेंट हायस्कूल समोर पार्क असलेला टेम्पो, मालवाहतूक टेम्पोसह 10 ते 12 वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले आहे.हा अल्पवयीन मुलगा आईसोबत राहत असून, तो कामधंदा करीत नाही. त्यामुळे आजूबाजूला राहणारे लोक त्याला सातत्याने हिणवत होते. त्याचा राग आल्यामुळे तणावातून त्याने मद्यपान केले. त्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास त्याने दांडक्याच्या साह्याने वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविली.
अचानकपणे आलेल्या आवाजामुळे नागरिकांनी मैदानाकडे धाव घेतली. त्यावेळी अल्पवयीन मुलगा वाहने फोडत असल्याचे दिसून आले. त्यानंतर नागरिकांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी धाव घेउन पंचनामा केला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले असून, याप्रकरणी चौकशी केली जात आहे.